नांदेड : निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलती-पुतण्यांचा पैनगंगा नदीपात्रात रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू… | पुढारी

नांदेड : निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलती-पुतण्यांचा पैनगंगा नदीपात्रात रेती तस्करांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू...

वाई बाजार, पुढारी वृत्तसेवा पुजेतील निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या चुलती व दोन पुतण्यांचा पैनगंगा नदीपात्रात रेतीतस्करांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना काल (शनिवार) दि. १३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. नदीपात्रातील बेसुमार वाळू उपसा या घटनेस जबाबदार असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाइकांसह ग्रामस्थांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाईची मागणी केली. जोपर्यंत तहसीलदार, मंडळअधिकारी, तलाठी, घटनास्थळावर येणार नाहीत तो पर्यंत मृतदेहांना हात लावू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहूर तालुक्यातील पडसा गावाच्या नजीक असलेल्या विदर्भातील मैजे कवठा बाजार येथील प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय अंदाजे ३५ वर्ष) (काकू) सोबतच कु. अक्षरा निलेश चौधरी (११ वर्ष) व कु. आराध्य निलेश चौधरी (९ वर्ष) ह्या तिघी चुलत्या-पुतण्या काल दि. १३ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या पैनगंगा नदीपात्रात पुजेतील निर्माल्य विसर्जनासाठी (बेलफुल वाहण्यासाठी) गेल्या होत्या. दरम्यान रेती तस्करांकडून रेतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात एका चिमुकलीचा तोल जाऊन ती डोहात पडल्याने तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगीही डोहात बुडाली. हे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली परंतू त्याही डोहात बुडाल्या.

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी नदी पात्राकडे धाव घेतली. परंतू तिघींनाही वाचवण्यात गावक-यांना अपयश आले. काही वेळाने तिघींचेही मृतदेहच वर आले. या घटनेमुळे कवठाबाजार संपुर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे नदीपात्रात वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळेच ह्या तिघींना जीव गेला असा आरोप करून संतप्त नातेवाइकांसह ग्रामस्थांनी आर्णीचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आजपर्यंत नदीपात्रात मृतदेहांसह ठिय्या मांडला आहे. जोवर तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, घटनास्थळावर येणार नाहीत तोपर्यंत मृतदेहांना हात लावू देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने अधिकची माहिती प्राप्त होवू शकली नाही.

हेही वाचा 

Back to top button