

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai high court) न्या. एस.एस.शिंदे आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने गुरुवार, दिनांक ९ रोजी आणि शुक्रवार, दिनांक १० रोजी सलग दोन दिवस न्यायालयाचे कामकाज रात्री आठ वाजेपर्यत सुरू ठेऊन याचिकांचा निपटारा करण्याचे काम केले. तब्बल १९० हून अधिक खटल्यांवर सुनावणी करण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाचे नियमित कामकाज सकाळी १०.३० वाजता सुरू होऊन संध्याकाळी ४.३० वाजता संपते. मात्र, गुरुवार आणि शुक्रवार सलग दोन दिवस न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाचे कामकाज रात्री आठ वाजेपर्यत सुरू होते. दोन्ही दिवशी खंडपीठाच्यासमोर १९० हून अधिक खटल्यांवर सुनावणी पार पडली.
यापूर्वी २०२१ मध्ये न्या. काथावाला यांनी सकाळी ११ ते पहाटे ३.३० वाजेपर्यंत सलग १७ तास न्यायालयाचे कामकाज चालावून इतिहास घडविला होता. उन्हाळी सुट्टीतील न्यायालय असूनही न्या. शाहरुख काथावाला व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने सुमारे १३ तास न्यायालयीन कामकाज केले होते.