

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
इमारतीच्या १९ व्या मजल्यावर आग लागली. क्षणाचाही विलंब न करता सुरक्षा रक्षक मनीष याने १९ व्या मजल्यावर धाव घेतली. शेकडो रहिवाशांना जीवदान देण्यात त्याने मोलाची कामगिरीही बजावली; पण अखेरच्या क्षणी आगीनेच त्यालाच आपल्या कवेत घेतलं. तो गंभीर जखमी झाला. गेली दोन दिवस त्याची मृत्यू विरोधात झूंज सुरु होती. अखेर ती संपली. त्याने आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. शेकडो जणांना अग्नितांडवातून बाहेर काढणार्या मनीषची 'एक्झिट' ही मन सुन्न करणारी ठरली आहे.
ताडदेव येथील सचिनम हाईट्स आग दुर्घटनेत इमारतीचा सुरक्षा रक्षक मनिष सिंग याचा आज सकाळी सात वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला . नायर रुग्णालयात मनिष सिंगवर उपचार सुरु होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर रहिवाशांना तात्काळ माहिती देत घराबाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम मनिषने केले होते. शेकडो रहिवाशांचे प्राण वाचवण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या मनिषला अखेरच्या क्षणी सुखरुप बाहेर पडता आले नाही. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर गेल्या दोन दिवसांपासून नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्याची प्राणज्योत मालवल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
ताडदेवमधील सच्चिनम हाईट्स इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर शनिवारी आग लागली होती. कमला डेव्हलपरने विकसित केलेल्या सच्चिनम हाईट्स या २० मजली इमारतीमध्ये लागलेल्या आगीत सहा नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. होता तर २३ जण जखमी झाले होते. अग्निशमन दलाच्या १३ फायर इंजिन, ८ जम्बो टँकर आणि उंच शिडीची वाहनांच्या मदतीने पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले होते. मात्र आग आणि धूर यांमुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून व व्हरांड्यातून बाहेर पडणे कठीण जात असल्याने ते अडकून पडले होते. अशा स्थितीत अग्निशमन दलाने इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यावरून सुमारे रहिवाशांची सुटका केली.
या आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच या समितीने पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचलं का?