

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या चाहत्यांसाठी 1 मे चा रविवार हा खास दिवस राहिला. संघाने सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध विजय मिळवला आणि महेंद्रसिंग धोनी (MS धोनी) ने पुन्हा एकदा कर्णधार म्हणून शानदार पुनरागमन केले. सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने पुन्हा मिळालेले कर्णधारपद आणि रवींद्र जडेजाचा राजीनामा याविषयावर खुलेपणाने चर्चा केली.
( Dhoni and Jadeja ) हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर स्टार एका क्रीडा वहिनीच्या प्रतिनिधीला मुलाखत देताना धोनी बोलत होता.
धोनी म्हणाला की, "जडेजाला मी मदत करू शकतो; पण त्याला चमचे खाऊ घालू शकत नाही. त्याला स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यावी लागली. कर्णधारपदामुळे त्याच्या वैयक्तिक कामगिरीवरही परिणाम होऊ लागला, जो कोणत्याही चाहत्याला पाहायला आवडणार नाही."
रवींद्र जडेजाला गेल्या हंगामातच माहित होते की, यावर्षी त्याला कर्णधारपद दिले जाईल. त्यामूळे त्याच्याकडे कर्णधारपदाच्या तयारीसाठी भरपूर वेळ होता आणि हे त्यालाही माहीत होते. त्याला नेतृत्वाच्या भूमिकेच्या तयारीसाठी वेळ देण्यात आला होता. खरेतर संघाच्या नेतृत्वात हा बदल मला हवाच होता, असेही धोनीने स्पष्ट केले.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये मी कर्णधार असतानाही जडेजाला मदत केली. यानंतरच मी नेतृत्वाची जबाबदारी त्याच्यावर टाकली. आता कोणता गोलंदाज वापरायचा हे त्याचं त्याने ठरवायचे होते. क्षेत्ररक्षण कसं लावले पाहिजे याचा निर्णय त्यालाच घ्यायचा होता; पण त्यातही मी त्याला वेळोवेळी मदत केली. नंतर मग मला असं वाटायला लागले की, तो फक्त टॉससाठी जातोय. आणि प्रत्यक्ष मैदानात मात्र मलाच त्याला सांगावं लागत आहे. प्रत्येकवेळी मी कॅप्टनला चमच्याने खाऊ घालून मदत करु शकत नाही ना. संघाचे नेतृत्व करताना महत्त्वाचे निर्णय तुम्हाला स्वतः घ्यावे लागतात. त्या निर्णयांची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागतेच. कर्णधार झाल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, असा सल्ला धोनीने दिला.
मला वाटते की, कर्णधारपदामुळे जडेजाच्या स्वतःच्या खेळावरही परिणाम होत आहे. कारण मला जडेजा एक फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून आवडतो. तुम्ही कर्णधारपद सोडले आणि फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररकक्षणात शंभर टक्के दिले तर तूम्ही सर्वोत्तम खेळ करू शकाल. हे माझ्यासाठी चांगले आहे. आम्हाला एका चांगल्या क्षेत्ररक्षकाची उणीव भासत आहे. मिड-विकेटवर चांगला क्षेत्ररक्षक नसल्यामुळे संघाला त्रास होत आहे, अशी खंतही त्याने बोलून दाखवली.
हेही वाचा :
पाहा व्हिडीओ :