

Nandurbar ZP जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आज एकूण २ लाख ८२ हजार ३८७ मतदारांपैकी १ लाख ८६ हजार ३२२ हून अधिक मतदारांनी म्हणजे जवळपास ६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. साडेपाच वाजेपर्यंतची ही अंदाजित आकडेवारी असल्याचे शासकीय माहितीत म्हटले आहे.
मतदारांचा उत्साह लक्षात घेता काही अंशी या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता असून ६८ ते ७० टक्के मतदान झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओबीसी आरक्षण हटवल्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेतील ( Nandurbar ZP ) ११ गटांच्या जागा तसेच पंचायत समितीच्या १४ जागा रिक्त झाल्या होत्या. त्यासाठी ही पोटनिवडणूक पार पडली. नंदुरबार जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता २-३ सदस्य कमी-जास्त होण्याने सत्तेची गणितं बदलू शकतात; असे राजकीय कार्यकर्त्यांना वाटते.
काँग्रेस २३, भाजपा २३, शिवसेना ७, राष्ट्रवादी ३ असे एकूण संख्या बळ होते. तथापि ओबीसी आरक्षण हटविण्याचा फटका बसून भाजपाला ७ जागा गमवाव्या लागल्या. आज झालेले मतदान भाजपाला जागा वाढवून देणार का? की, काँग्रेस- शिवसेनेचे बळ वाढवणार? हे आजच्या मतदानातून सिद्ध होणार असल्यामुळे गावागावात चुरस पाहायला मिळाली. आजच्या मतदानातून युवा नेत्यांचे भविष्य देखील मतपेटीत बंद झाले आहे. यात माजी मंत्री तथा भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या तथा भाजपाच्या खासदार डॉ. हीना गावित यांच्या भगिनी डॉ. सुप्रिया गावित कोळदा जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहेत.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे चिरंजीव तथा ओबीसी आरक्षणामुळे ज्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सोडावे लागले ते ॲड. राम रघुवंशी कोपर्ली गटातून उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात डॉ. विजयकुमार गावित यांचे पुतणे पंकज गावित उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्याच बरोबर पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या भगिनी गीता पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या पत्नी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सयाजीराव मोरे यांच्या स्नुषा अशा नव्या उमेदवरांच्या लक्षवेधी लढतींचे भवितव्य मतपेटीत बंद होत असून त्यामुळेच या मतदानाविषयी सर्वत्र उत्सूकता आहे.
दरम्यान, शहाद्यातील अदखलपात्र गुन्हा दाखल होण्याव्यतरिक्त कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी दिली. नंदुरबार तालुक्यातही आतापर्यंत शांततेत मतदान पार पडल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल पवार यांनी दिली. मतदान प्रक्रिया आणि कायदा-सुव्यवस्था या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नंदुरबार तालुक्यातील कोळदा, खोंडामळी, भागसरी येथील मतदान केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तथापि सर्वत्र जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी कडक बंदोबस्त ठेवला असून १००० पोलिस अधिकारी कर्मचारी व एस. आर. पी. च्या दोन कंपन्या तैनात ठेवण्यात आले आहेत.
महिला मतदान – ३५१०८
पुरुष मतदान -३७१५२
एकूण मतदान -७२२६०
टक्केवारी – २५.५९*
महिला मतदान – ६०१५८
पुरुष मतदान -५९६२८
एकूण मतदान -१२०१४६
टक्केवारी – ४२.५५
महिला मतदान – ७६३७८
पुरुष मतदान -७६९७१
एकूण मतदान -१५३३४९
टक्केवारी – ५४.३०
महिला मतदान : ९०७११
पुरुष मतदान – ९५६११
एकूण मतदान – १८६३२२
टक्केवारी – ६५.९८