

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे.
पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. रोहित पवार यांनी स्वत: ट्विट करून या बाबत माहिती दिली आहे. रोहित पवार यांच्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, सचिवपदी शुभेंद्र भांडारकर, खजिनदारपदी सांगलीचे संजय बजाज आणि सह सचिव संतोष बोबडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला. असोसिएशनच्या बैठकीत सर्वप्रथम रोहित पवार यांना एमसीएच्या 16 सदस्यीय समितीत सामील केले गेले आणि नंतर असोसिएशनचे अध्यक्षपद ही सोपवण्यात आले. शरद पवार यांच्यानंतर आता रोहित पवार हे त्यांच्या कुटुंबातील दुसरी सदस्य आहेत, ज्यांची एमसीए अध्यक्षपदी निवड झाली आहे.
या निवडीनंतर बोलताना रोहित पवार म्हणाले, क्रिकेट नेहमीच माझ्या आवडीचा खेळ राहीलाय. आता एमसीएच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंसाठी काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. सर्वांना सोबत घेऊन खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.
-हेही वाचा