पुणे : रस्त्याची ती वादग्रस्त निविदा अखेर रद्द | पुढारी

पुणे : रस्त्याची ती वादग्रस्त निविदा अखेर रद्द

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने रस्त्यांच्या कामासाठी काढलेल्या 53 कोटींची निविदा आपल्या मर्जीतील ठेकेदाराला मिळावी, यासाठी भाजपच्या माजी पदाधिकार्‍यांनी ताकद पणाला लावत प्रशासनावर दबाव वाढवला होता. मात्र, याबाबत अधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी ही वादग्रस्त निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यात ‘जी 20’ परिषद होत आहे. यासाठी महापालिकेने शहरातील रस्ते डांबरीकरण करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा खर्चाचे अंदाज काढला आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यात तीन पॅकजेमध्ये 50 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 193 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहेत. त्यानंतर दुसर्‍या तीन पॅकेजमध्ये 142 कोटी रुपयाची कामे केली जाणार आहेत. त्यातील दोन पॅकेज प्रत्येकी सुमारे 53 कोटी रुपयांचे आहेत. तर पॅकेज 36 कोटीचे आहे.

दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या व एकूण पॅकेजमधील चौथ्या क्रमांकाच्या 53 कोटीच्या निविदेसाठी चार ठेकेदारांनी प्रस्ताव भरले. मात्र, मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे, यासाठी दोन माजी सभागृह नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. निविदेतील 30 किलोमीटरच्या आत आवश्यक प्लांट याच्या अटीवरून वाद सुरू आहे. या माजी सभागृहनेत्यांनी स्वतः तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत आपल्याच ठेकेदाराची निविदा पात्र ठरावी यासाठी फिल्डींग लावून ही कामे अधिकार्‍यांकडून करून घेण्याच्या प्रयत्नात केला होता.

Back to top button