

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सोमवारी KKR ने पंजाब किंग्जचा पराभव केला आणि प्लेऑफचे समीकरण पुन्हा एकदा बदलले. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबवर 5 गडी राखून मात केली आणि प्लेऑफसाठी आपली मजबूत दावेदारी मांडली. (MI vs RCB)
पराभवानंतर प्ले ऑफमध्ये खेळण्याचा पंजाब किंग्जचा मार्ग अवघड बनला आहे. दुसरीकडे कोलकाताच्या विजयामुळे दोन संघांना सर्वाधिक फटका बसला आहे ते म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स. (MI vs RCB)
आयपीएल पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाले तर, बेंगलोर सहाव्या स्थानावर आहे. तर, मुंबईची आठव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. विशेष म्हणजे आज (दि.९) आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे. आजच्या सामन्यात पराभव झालेल्या संघाची पुढील वाटचाल अवघड होणार आहे.
या दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, RCB आणि MI ने दहा सामने खेळले आहेत. दोन्ही संघाना दहापैकी पाच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर, पाच सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. पण, यामध्ये बेंगलोरचा नेट रन रेट चांगला असल्यामुळे ते पॉईंट टेबलमध्ये मुंबईच्या पुढे आहेत.
उर्वरित स्पर्धेमध्ये दोन्ही संघांना आणखी चार सामने खेळायचे आहेत. जर दोन्ही संघांनी सर्व सामने जिंकले तर त्यांचे एकूण गुण १८ होतील. पण, प्रकरण इथेच अडकले आहे की, दोन्ही संघ चार सामने जिंकू शकत नाहीत, कारण या दोन्ही संघांना आजच्या सामन्यात एकमेकांशी भिडायचे आहे. म्हणजेच, एकच संघ चार सामने जिंकू शकतो आणि दुसरा संघ तीन सामने जिंकू शकतो. जो संघ तीन सामने जिंकेल त्याचे १६ गुण होतील. गुजरात टायटन्स १६ गुणांसह आधीच अव्वल स्थानावर आहे, तरीही गुजरातचा प्ले ऑफमध्ये प्रवेश झालेला नाही.
मुंबई इंडियन्सला चार सामने खेळायचे आहेत, तीन सामने त्यांच्या घरच्या म्हणजे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. तर, बेंगलोरला उर्वरित चार सामन्यांपैकी केवळ एकच सामना घरच्या मैदानावर खेळता येणार आहे. अशा स्थितीत समीकरणे जुळली तर मुंबई आणि बेंगलोर यापैकी एक संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल. आता कोणता संघ प्ले ऑफमध्ये खेळणार हे येणा-या काही तासांत स्पष्ट होईल.
हेही वाचा;