ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढविण्यासाठी आराखडा तयार करा : शंभूराज देसाई 

 शंभूराज देसाई
शंभूराज देसाई
Published on
Updated on
ठाणे  : पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यात भात, वरी पिकांबरोबरच सोनचाफा, हळद, भेंडी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न वाढावे, यासाठी आराखडा तयार करावा. तसेच खरीप हंगामात खते, बियाणे, पीककर्ज पुरवठा सुरळीत होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज (दि. ९) येथे दिले.
पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री हे दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. आमदार किसन कथोरे हे दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी दीपक कुटे, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी सारिका शेलार, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीस उपस्थित होते.
जिल्हा कृषि विभागाने केलेल्या खरीप हंगामा 2023च्या नियोजनाचा आढावा घेऊन पालकमंत्री  देसाई म्हणाले की, जिल्ह्यातील लागवडी योग्य क्षेत्र दुप्पटीने वाढविण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे.  मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात सोनचाफा फुलाचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे हे क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा कृषि विभागाने आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषि पतपुरवठा मिळावा, याकडेही लक्ष द्यावे. एक रुपयांत पीक विमा  योजनेपासून जिल्ह्यातील एकही शेतकरी वंचित राहता कामा नये, याची दक्षता घ्यावी.
ग्रामीण भागातील भाजीपाला तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांना शहरी भागात मोक्याच्या जागी तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध मॉलमध्ये जागा मिळावी, यासाठी आराखडा तयार करावा. महानगरपालिकांच्या क्षेत्रात महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक घेऊन सूचना देऊ, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आमदार कथोरे म्हणाले की, जिल्ह्यात आंबा पिकाऐवजी फणस, काजू, हळद या पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याचा भाजीपाला विक्रीसाठी शहरी भागात जागा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना ताजा भाजीपाला मिळेल व शेतकऱ्यांच्या मालाला रास्त किमतही मिळेल. आमदार  मोरे यांनीही नागली, वरई व बांधावरील तूरच्या उत्पादनावर भर देण्याची सूचना केली.
जिल्हाधिकारी  शिनगारे यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील कृषि क्षेत्राची माहिती दिली.  जिल्ह्यात भात व नागली या पिकांबरोबरच हळद, सोनचाफा फुलांच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. तसेच भात पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यावर कृषि विभाग भर देत आहे. 2022 मध्ये भात उत्पादकतेमध्ये सरासरी 23 टक्के वाढ झाली आहे. यंदा  2023-24 मध्ये एकूण 56 हजार  हेक्टर क्षेत्रावर भात पेरणीचे लक्षांक ठेवले असून 2700 किलो प्रति हेक्टर उत्पादनाचे लक्ष ठेवले आहे.
जिल्ह्यात नाचणी पिकाची  सरासरी उत्पादकता 949 किलो प्रति  हेक्टर  एवढी असून खरीप हंगाम 2022  मध्ये 1138.12 किलो प्रति हेक्टर उत्पादकता होती. 2023-24 मध्ये एकूण 3542 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन आहे, असेही  शिनगारे यांनी सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी. कुटे यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम सन 2023चे नियोजनाची माहिती दिली. या हंगामासाठी सुमारे 12 हजार क्विंटल बियाणांची मागणी केली असून त्याप्रमाणे पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 842 हेक्टर क्षेत्रावर संकरित बियाणाचा वापराचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते व बियाणांचे पुरवठा करण्यात येणार असल्याचे  कुटे यांनी सांगितले.

असे आहे सन 2023-24 चे नियोजन

• नागली या पौष्टिक तृणधान्याच्या क्षेत्रामध्ये 30 टक्के तर वरी पिकामध्ये 10 टक्के वाढ करण्यात येणार
• शेत तिथे पौष्टिक तृणधान्य मोहिमेअंतर्गत 30 हजार 400 मिनी किट वाटपाचे नियोजन
• प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगातून नागली व वरी पिकावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देणार
• सगुणा भात लागवड तंत्रज्ञान पद्धतीने एक हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन
• रत्नागिरी 6 व 8 या वाणांचा 100 हेक्टर क्षेत्रावर ग्रामबिजोत्पादन घेणे
• बांधावर तूर लागवड क्षेत्रात 10 टक्के वाढीचे उद्दिष्ट
• मग्रारोहयो अंतर्गत मोगरा, सोनचाफा, जांभूळ, फणस या पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजन
• भेंडी व इतर पिकांच्या निर्यातीस चालना देण्यात येणार
• विकेल ते पिकेल अंतर्गत भाजीपाला व प्रक्रियायुक्त शेतमालाची थेट शहरी ग्राहकांना विक्री
हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news