

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील हाय व्होल्टेज ड्रामा चेन्नईच्या वीरांनी जिंकला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईला 20 धावांनी हरवले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 206 धावा केल्या. तर मुंबईचे प्रत्युत्तर 186 धावांवर थांबले. मुंबईच्या रोहित शर्माने शतकी झुंज दिली. परंतु, त्याला कर्णधारासह इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने ही झुंज निष्फळ ठरली. रोहित 63 चेेंडूंत 105 धावांवर नाबाद राहिला. त्याने 11 चौकार आणि 5 षटकार मारले. मथिशा पथिराणाने चार विकेट घेत विजयात हातभार लावला. चेन्नईच्या डावात हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात दिलेल्या 26 धावाच जय-पराजयातील अंतर स्पष्ट करण्यासाठी निर्णायक ठरल्या. (MI vs CSK)
घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जच्या 207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी पहिल्या 6 षटकांत 63 धावा चोपल्या. यात रोहितच्या 42, तर इशान किशनच्या 21 धावांचे योगदान होते. 7 षटकांत 70 धावा हा कोणत्याही संघासाठी ड्रीम स्टार्ट होता; पण येथून पुढे पारडे फिरले.
आठव्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंनी मुंबईचा घात केला. पहिल्या चेंडूवर इशान किशन (23), तर दुसर्या चेेेंडूवर सूर्यकुमार बाद झाला. यावेळी मिळवलेली पकड चेन्नईने शेवटपर्यंत सोडली नाही. एका बाजूने रोहित शर्मा जीव तोडून पराक्रमाची शर्थ करीत होता. परंतु, दुसर्या बाजूने फलंदाज फक्त हजेरी लावायचे काम करीत होते. तिलक वर्मा (31), हार्दिक पंड्या (2), टीम डेव्हिड (13), रोमारिओ शेफर्ड (1) यांनी अवसानघात केल्यामुळे मुंबईचा पराभव निश्चित झाला होता, चाहत्यांना आता फक्त अपेक्षा होती, ती हिटमॅनच्या शतकाची. रोहितने 61 चेंडूंत शतक गाठले; पण त्याने शतकाचा कसलाही जल्लोष केला नाही. पराभवाचे दु:ख त्याच्या चेहर्यावर दिसत होते. 20 षटकांत मुंबईने 6 बाद 186 धावा केल्या. चेन्नईच्या मथिशा पथिराणा याने 28 धावांत 4 विकेट घेतल्या. (MI vs CSK)
चेन्नईने अचंबित करणारा डाव टाकला आणि लोकल बॉय अजिंक्य रहाणे याला त्यांनी रचिन रवींद्रसोबत सलामीला पाठवले. मोहम्मद नबीच्या पहिल्याच षटकात रहाणेने चौकार खेचला खरा, परंतु दुसर्या षटकात जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर पूल शॉटवर तो झेलबाद झाल. चेन्नईला 8 धावांवर पहिला धक्का बसला; पण ऋतुराजने धावांचा वेग वाढवला अन् सोबतीला रवींद्र उभा होताच. श्रेयस गोपाळला रवींद्रची (21) विकेट इशान किशनच्या कृपेमुळे मिळाली. मैदानावरील अम्पायरने नाबाद निर्णय दिला होता. परंतु, इशान किशनने 'डीआरएस' घेण्यासाठी हार्दिकला मनवले आणि तो निर्णय योग्य ठरला. रवींद्र व ऋतुराज यांनी 52 धावांची भागीदारी केली.
त्यानंतर लोकल बॉय शिवम दुबेने मुंबई इंडियन्सच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. ऋतुराजने 33 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ दुबेनेही 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी चौकार-षटकारांचा सपाटा लावला होता आणि हार्दिक पंड्याने ही जोडी तोडली. उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात ऋतुराज 69 (40 चेंडू, 5 चौकार व 5 षटकार) धावांवर झेलबाद झाला. त्याने तिसर्या विकेटसाठी दुबेसह 45 चेंडूंत 90 धावांची भागीदारी केली.
ऋतुराज बाद झाला तरी दुबे थांबत नव्हता आणि त्याने रोमारियो शेफर्डच्या चौकार-षटकारांची आतषबाजी केली. धोनीच्या आधी डॅरिल मिशेलला पाठवण्याचा निर्णय चाहत्यांना फार आवडला नाही. मिशेल 14 चेंडूंत 17 धावांवर झेलबाद झाला आणि शेवटच्या 4 चेंडूंसाठी धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून गेले. धोनीने पहिलाच चेंडू मिड ऑनच्या दिशेने सीमापार पाठवला. त्यानंतर पुढील दोन चेंडू षटकार खेचले व शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेऊन धोनीने 4 चेंडूंत 20 धावा चोपल्या व सीएसकेला 4 बाद 206 धावांपर्यंत पोहोचवले. दुबे 38 चेंडूंत 10 चौकार व 2 षटकारांसह 66 धावांवर नाबाद राहिला. (MI vs CSK)
एम. एस. धोनीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात धोनीने 4 चेंडूंचा सामना करताना 3 षटकारांच्या जोरावर नाबाद 20 धावा केल्या.
धोनीने चेन्नईसाठी एकूण 5,016 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 23 अर्धशतकांचा समावेश आहे. तो आता 'सीएसके'साठी 5,000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी सुरेश रैनाने हा पराक्रम केला होता. रैनाने 'सीएसके'साठी 5,529 धावा केल्या होत्या.
एम. एस. धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. तो 'सीएसके'साठी आतापर्यंत 250 सामने खेळला आहे. धोनी टी-20 फॉरमॅटमध्ये एकाच संघासाठी 250 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे.
हेही वाचा :