

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे म्हाडा गृहनिर्माण योजनेतील घरांसाठीच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज करण्याची प्रक्रिया किचकट झाली असून, परिणामी अर्जांची संख्या घटली आहे. ऑनलाइन नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सोमवारपर्यंत 19 हजार नागरिकांनी घरासाठी नोंदणी केली असून, त्यातील सुमारे दहा हजार जणांनी पैसे भरले आहेत.
म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील 431 सदनिका, 15 टक्के सामाजिक गृह योजनेतील 344 सदनिका, प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य योजनेतील 2 हजार 445 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 हजार 445 सदनिका अशा एकूण 5 हजार 863 सदनिकांसाठी सोडत होणार आहे.
विविध उत्पन्न गटांतील नागरिकांना म्हाडाच्या घरांसाठी 5 सप्टेंबरपासून ऑनलाइन पध्दतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत म्हाडाच्या घरांसाठी 26 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहेत. तर अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज वेळेत सादर करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
घरांसाठी अर्ज करण्यासाठी किचकट प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने तुलनेत अर्जांची संख्या कमी झाली आहे. विशेष म्हणजे अर्ज करूनही अधिवास प्रमाणपत्र सलग सार्वजनिक सुट्या आल्यामुळे नागरिकांना मिळालेले नाही. त्यामुळे अर्जासाठी आणखी किमान 10 दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, शेवटच्या दिवशी किती अर्ज सादर होतील, त्यानंतर मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी सांगितले.
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gove.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery. mhada. gov. in या संकतेस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा