‘समूह शाळा’ प्रयोगात 30 हजारांवर शिक्षक अतिरिक्त?

‘समूह शाळा’ प्रयोगात 30 हजारांवर शिक्षक अतिरिक्त?
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून निवडक ठिकाणी 'क्लस्टर स्कूल' तथा समूह शाळा सुरू करण्याची प्रक्रिया महायुती सरकारने सुरू केल्यामुळे ग्रामीण तथा दुर्गम भागातील विद्यार्थी शाळांबाहेर फेकले जाणार असून, राज्यभरातील 30 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्यातील दुर्गम भागामधील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करा आणि त्यातील विद्यार्थ्यांसाठी 'क्लस्टर स्कूल' (समूह शाळा) सुरू करण्याचे प्रस्ताव 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिले आहेत. नंदुरबार येथील तोरणमाळ व पुणे जिल्ह्यातील पानशेत या दोन 'क्लस्टर स्कूल'च्या धर्तीवर या समूह शाळा उभारल्या जातील. शून्य ते 20 पटसंख्येच्या शाळांची माहिती मागवण्यात आली असून, या सर्व शाळा बंद केल्या जातील. कुलूप ठोकल्यानंतर या शाळांचे विद्यार्थी समूह शाळेत समायोजित होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे घरापासूनचे किती अंतर वाढेल, याचा कोणताही विचार झालेला नाही. या शाळा बंद केल्याने अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे काय? हा प्रश्नही अनुत्तरित आहे.

ग्रामीण तथा दुर्गम भागात वाहतुकीची कोणतीही सक्षम व्यवस्था नसताना विद्यार्थ्यांच्या प्रवासाबद्दल शिक्षण विभागाने चकार शब्द काढलेला नाही. दूरच्या अंतरावरील समूह शाळेत लहान मुली पाठवण्यास पालकांनी नकार दिल्यास शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे आणि खासकरून मुलींचे प्रमाण वाढेल, असे मत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केले.

15 हजार शाळा कुलूप बंद होणार

  • 'युडायस'मधून मिळालेल्या आकडेवारीतून तब्बल 15 हजार शाळा या निर्णयाने कुलूप बंद होतील, अशी भीती आहे. त्या तुलनेत सुरू होणार्‍या समूह शाळा मात्र अत्यल्प असतील.
  • राज्यात सर्वाधिक 1 हजार 375 शाळा रत्नागिरीतील बंद होतील. त्याखालोखाल रायगड 1 हजार 295 आणि पुणे जिल्हा 1 हजार
    132 शाळा आहेत. सातारा जिल्ह्यातही 1 हजार 39 शाळांना कुलूप लागणार आहे.
  • अशा 15 हजार शाळा बंद झाल्यास त्यात शिकणारे 1 लाखावर विद्यार्थी आणि किमान 30 हजार शिक्षकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा

  • कोकण विभाग : मुंबई 117, पालघर 317, ठाणे 441, रत्नागिरी 1,375, सिंधुदुर्ग 835, रायगड 1,295.
  • नाशिक विभाग : नाशिक 331, जळगाव 107, अहमदनगर 775, धुळे 92, नंदुरबार 189.
  • पुणे विभाग : पुणे 1,132, सातारा 1,039, सोलापूर 342, सांगली 415, कोल्हापूर 507.
  • औरंगाबाद विभाग : औरंगाबाद 347, बीड 533, जालना 180, लातूर 202, नांदेड 394, उस्मानाबाद 174, परभणी 126, हिंगोली 93.
  • नागपूर विभाग : नागपूर 555, चंद्रपूर 437, वर्धा 398, गडचिरोली 641, गोंदिया 213, भंडारा 141.
  • अमरावती विभाग : अमरावती 394, अकोला 193, बुलडाणा 158, वाशिम 133, यवतमाळ 350.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news