मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन

मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांचे निधन
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार (वय ८२) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आयुष्यभर मराठा समाजासाठी झटणारे नेते म्हणून ओळख असणारे पवार आज मंडणगडवरून कारने मुंबईकडे निघाले असताना त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रत्नागिरी मराठा बिझनेसमेन फोरमच्या बैठकीसाठी ते परवा मुंबईहून तेथे गेले होते. मंगळवारी संध्याकाळी तेथून परत येताना वाटेतच त्यांना पाली परीसरात हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच खोपोली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११ वाजता दादर येथील त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मराठा आरक्षणाचा विषयातील गुंतागुंत पाहून तो विषय लांबत असल्याने मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मताचे ते होते. त्यासाठी या वयातही त्यांनी आंदोलन केले व आंदोलन प्रखर करण्याचा इशाराही त्यांनी यापूर्वीच जाहीर केला होता. मराठा महासंघाच्या निवडणुका सध्या सुरु असून त्यासाठी त्यांनी त्यात मार्गदर्शन केले होते व सक्रिय सहभाग घेतला होता. मराठा महासंघात दोन वर्षांपूर्वी फूट पडल्याने त्यांना मोठा मनस्ताप झाला होता. त्यामुळे ते सतत विवंचनेत होते. मात्र त्यातूनही सावरून पुन्हा त्यांनी संघटना बांधणीचे काम सुरु केले होते.

कट्टर मराठा नेते असले तरी अन्य समाजांबरोबर त्यांनी समन्वयाची भूमिकाही घेतली होती. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे नेते अशी त्यांची ख्याती होती. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्यांवर त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराबाबत त्यांनी घेतलेल्या समन्वयाच्या भूमिकेमुळे त्यांना नंतर राज्य सरकारने दलितमित्र पुरस्कारही दिला होता.

शाहू महाराज, महाराजा गायकवाड आदींच्या पुढाकाराने सन १९०० च्या आसपास क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरु झाली. १९८१ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ असे तिचे नाव बदलण्यात आले. मात्र त्यापूर्वीपासून म्हणजे सुमारे १९६४ पासूनच पवार हे संस्थेत काम करीत होते. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर १९९० च्या आसपास पवार यांनीच संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी १९८० पासून विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले होते. या संस्थेचे ते उपाध्यक्ष होते.

आपली वकिली आणि व्यवसाय सोडून पवार यांनी समाजाच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले व अखिल भारतीय मराठा महासंघ ही संस्था नावारुपाला आणली. आरक्षणाच्या चळवळीत काहीकाळ अण्णासाहेब पाटील त्यांच्याबरोबर होते. सर्व मराठा उद्योजकांच्या मराठा बिझनेसमेन फोरम या संस्थेचा पसाराही त्यांनीच वाढविला. देशभरातील क्षत्रियांच्या अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संस्थेचे ते राज्य अध्यक्ष होते. त्यांनी गावदेवीला शारदा शिक्षण सेवा समितीची स्थापना करून त्यामार्फतही शैक्षणिक कार्य केले होते. त्याच्या निधनाने मराठा चळवळीतील एक हुशार व संयमी नेता गमावला आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

हे वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news