Sangli : मिरजेत पाचव्या मजल्यावरून पडून बालिका ठार | पुढारी

Sangli : मिरजेत पाचव्या मजल्यावरून पडून बालिका ठार

मिरज; पुढारी वृत्तसेवा : शहरातील झारीबाग परिसरातील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने यशवी निलेश देशमाने या चार वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात कोणी नसताना ही दुर्दैवी घटना घडली. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मिरजेतील क्षकिरण तज्ञ डॉ. निलेश देशमाने हे झारीबाग परिसरात असणाऱ्या एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर राहतात. डॉ. देशमाने यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी आजारी असल्याने देशमाने दाम्पत्याने सोमवारी रात्री तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. मात्र यावेळी रुग्णालयात जात असताना त्यांची लहान मुलगी यशवी ही झोपेत असल्याने डॉ. देशमाने यांनी घराला बाहेरून कुलूप लावून गेले. परंतु ते बाहेर जात असताना गडबडीत गॅलरीचा दरवाजा मात्र बंद करण्यास विसरले होते.

थोड्या कालावधीनंतर यशविला जाग आली. ती पालकांना शोधत गॅलरीत गेली. त्याचवेळी ती पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत तपास करण्यात येत आहे.

Back to top button