Accident : शिर्डीला जाणाऱ्या कर्नाटक भाविकांच्या गाडीचा अपघात; तीन वाहनांच्या धडकेने मोठी दुर्घटना | पुढारी

Accident : शिर्डीला जाणाऱ्या कर्नाटक भाविकांच्या गाडीचा अपघात; तीन वाहनांच्या धडकेने मोठी दुर्घटना

वडीगोद्री; पुढारी वृतसेवा : बस, कार व मालवाहू गाडीच्या तिहेरी अपघातात एक जण गंभीर तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील जखमी शिर्डीला जात असणारे काही कर्नाटकचे भाविक होते. धुळे-सोलापूर महामार्गावरील सौन्दलगावजवळ ही दुर्घटना घडली असून या अपघातात कारचा चुराडा झाला आहे. शिर्डीला जाणाऱ्या कर्नाटकाच्या भाविकांचा अपघात झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, कर्नाटकहुन काही भविक चारचाकीने (वाहन क्र. के ए 25 एम बी 2546) धुळे -सोलापूर महामार्गाद्वारे शिर्डीला जात होते. अंबड तालुक्यातील सौन्दलगाव जवळ भाविकांच्या चारचाकीला एका मालवाहू ट्रक ओव्हर टेक करत असताना मागून जोराची धडक दिली. या धडकेत चारचाकी दुभाजकावरून दुसऱ्या लेन ला जाऊन पडली. दरम्यान समोरून औरंगाबादहुन बिडकडे जाणाऱ्या बसने या चारचाकी वाहनाला पुन्हा जोराची धडक दिली. दोन वाहनांनी जोराची धडक दिलेल्या चारचाकीचे मोठे नुकसान झाले. या गाडीतील एअर बॅग फुटल्याने कार चालकाला गंभीर मार लागला असून प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच यामध्ये चालकाव्यतिरिक्त आणखी तीन जण गंभीर असून यातील दोन महिला आहेत.

घटनेची माहिती देऊन देखील घटनास्थळी रुग्ण वाहिका वेळेत न आल्याने औरंगाबादकडे जाणाऱ्या एका रुग्णवाहीकेला थांबवून जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे हलविण्यात आले.

या अपघातात गंभीर जखमी काशिनाथ (वय 45) यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर हुलगी अम्मा (वय 40), श्रीदेवी (वय 55) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. हे सर्वजण मूळचे कर्नाटकमधील विजापूर येथील आहेत. या सर्वांच्यावर पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Back to top button