

Aajibai Chi Shala Maharashtra Viral Video: आजीबाईंचा शाळेत जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हातात वह्या–पुस्तकं, अंगावर पारंपरिक नऊवारी आणि शिकण्याची इच्छा असणाऱ्या आजीबाईंचा व्हिडिओ पाहताच लोक त्यांच्या प्रेमात पडले आहेत. या व्हिडिओत एकच मेसेज आहे तो म्हणजे शिकण्याला वयाचे बंधन नसते.
हृदयाला भिडणारा व्हिडिओ मुरबाडमधील ‘आजीबाईंची शाळा’ या उपक्रमाचा आहे.
हा उपक्रम योगेश बांगर यांनी सुरू केला असून, शाळा दर शनिवार आणि रविवारी भरते. फंगणे गावातील वयोवृद्ध महिलांना येथे पूर्णपणे मोफत प्राथमिक शिक्षण दिले जाते. लहानपणी घरची परिस्थिती, समाजातील बंधने किंवा संधीअभावी शाळेत जाऊ न शकलेल्या या आजीबाई आता अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करत आहेत.
या शाळेत आजीबाई अक्षरओळख, वाचन–लेखन, गणित शिकत आहेत. काहींच्या हातात पहिल्यांदाच वह्या–पुस्तकं, तर काही पहिल्यांदाच पाटीवर अक्षर गिरवत आहेत. त्यांच्या उत्साहाने एक गोष्ट सिद्ध होते. शिकण्याची इच्छा असेल, तर वयाचा अडथळा येत नाही.
व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरातून कौतुकाचा ओघ सुरू झाला. एका युजरने लिहिले “सोशल मीडियावर पाहिलेली आजपर्यंतची सर्वात सुंदर गोष्ट!”
दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली “हा व्हिडिओ पाहून मन आनंदाने भारावून गेलं.” तर आणखी एक म्हणाला “असे उपक्रम पाहून भारत बदलतोय याची खात्री वाटते.”
‘आजीबाईची शाळा’ हा फक्त एक शिक्षण प्रकल्प नाही; तर तो आयुष्यभर शिकत राहण्याची प्रेरणा देणारा आदर्श उपक्रम आहे. ज्ञाना समोर वय, परिस्थिती किंवा मर्यादा काहीच नसतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.