

शिक्रापूर: पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील जुन्नर, आंबेगाव, खेडसह शिरूर तालुक्यात बिबट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधारे तयार केलेले बिबट्याचे, वाघाचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. ते व्हिडीओ खरे असल्याचा भास होत असल्याने परिसरातील नागरिकांची धास्ती वाढली आहे. मात्र, अफवा टाळण्यासाठी अशा व्हिडीओ, फोटोंची सत्यता पडताळण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये बिबट्या नेमक्या कोणत्या ठिकाणी दिसला, याची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसते. अनेकदा व्हिडीओचे लोकेशन खोटे असल्याचे सिद्ध होते. परंतु, एआय टूल्सच्या मदतीने तयार केलेले हे ’डीपफेक’ व्हिडीओ इतके उच्च दर्जाचे असतात की सामान्य नागरिकाला ते खरे वाटतात. यामुळे लोकांमध्ये आपल्या घराशेजारी बिबट्या फिरत आहे आणि धोका वाढला आहे, अशी अफवा पसरते. परिणामी, अनेक ठिकाणी अनावश्यक तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एआय तंत्रज्ञान हे अत्याधुनिक असले तरी, त्याचा गैरवापर करून सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. यामागे केवळ ’लाइक्स’ आणि ’व्ह्यूज’ मिळविण्याची लालसा किंवा हेतुपुरस्सर गैरसमज पसरविण्याचा हेतू असू शकतो. विशेषतः वन्यजीव आणि मानवी वस्तीतील संघर्ष हा संवेदनशील विषय असल्यामुळे अशा खोट्या माहितीमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.
काय काळजी घ्यावी
या गंभीर समस्येवर प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम अशा व्हिडीओ आणि फोटोंच्या स्रोताची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक वन विभाग किंवा पोलिस यंत्रणेने अधिकृतपणे माहिती दिल्याशिवाय कोणत्याही व्हिडीओवर किंवा फोटोवर विश्वास ठेवू नये.
वन विभागाशी संपर्क साधा
एखाद्या भागात बिबट्याचे खरे दर्शन झाल्यास त्याबद्दलची अधिकृत माहिती आणि धोक्याची सूचना त्वरित दिली जाते, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी व्हिडीओ पाहून घाबरून जाऊ नये. सर्वप्रथम वन विभागाशी संपर्क साधून सत्यता तपासावी. केवळ व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो म्हणून व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये.
चुकीची आणि बनावट माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. केवळ व्हायरल होत आहे म्हणून कोणतीही सामग्री- पुढे न पाठवता वस्तुस्थिती तपासावी. एआयच्या गैरवापराने निर्माण होणाऱ्या अफवांना बळी पडू नये. सत्य माहिती आणि जनजागृती हेच यावर प्रभावी उपाय आहेत.
नीलकंठ गव्हाणे, वन अधिकारी, शिरूर