बुलढाणा : रेल्वे राज्यमंत्र्यांच्या विधानाने जिल्ह्यात अस्वस्थता; खासदार जाधव म्हणतात की..

बुलढाणा : रेल्वे राज्यमंत्र्यांच्या विधानाने जिल्ह्यात अस्वस्थता; खासदार जाधव म्हणतात की..
Published on
Updated on

बुलढाणा; विजय देशमुख : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडजवळील एका कार्यक्रमात जालना-खामगाव रेल्वेमार्गाबाबत एक वक्तव्य केले. याबाबतची दीड मिनिटांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बुलढाणा जिल्हावासियांमध्ये निराशेच्या व संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या.

दानवे म्हणाले की,"जालना ते खामगाव रेल्वेमार्ग करा म्हणणारा रावसाहेब दानवे रेल्वेमंत्री होईल कुणी पाहिलं होतं का?जालन्याहून खामगावला रेल्वे गेली पण सध्या काय परिस्थिती आहे? पाच हजार कोटी रूपये लागतात, जालना जिल्ह्यात फक्त १२ कि.मी. मार्ग अन् रेल्वे स्टेशन फक्त न्हावा या एकाच गावाला मिळणार आहे. यात माझ्या मतदारसंघाला फायदा काय? मी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलावलं आणि सांगितलं जालन्याहून जळगावला रेल्वे नेण्यासाठी स्थिती काय आहे? १७४ कि.मी.चा हा मार्ग आहे, यामध्ये १४० कि.मी. माझ्या मतदारसंघातून जातो." दानवे यांनी जालना-खामगाव हा बहूप्रतिक्षित रेल्वेमार्ग जालन्याहून जळगावकडे वळवल्यामुळे सोशल मिडियावर नेटक-यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना ट्रोल केले आहे. दानवे यांच्या भाषणातील विधानांनी बुलढाणा जिल्हावासियांच्या आशेवर पाणी फिरून जखमेवर मीठ चोळल्याची भावना बळावली आहे. परिणामस्वरूप या विषयावरून बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना जिल्ह्यातील नागरिकांनी, अनेक संघटनांनी भंडावून सोडल्याने खासदार जाधव यांची डोकेदुखी वाढली आहे. याबाबत एकेका नागरिकाला कसे सांगणार? अखेर त्रस्त झालेले खासदार जाधव यांनी बुधवारी सायंकाळी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन जालना-खामगाव रेल्वेमार्गाबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना-जळगाव असा रेल्वेमार्ग होणार असल्याचे सांगितले असले तरीही जालना-खामगाव हा देखील रेल्वेमार्ग होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. या मार्गाचे सर्वेक्षण झालेले असून डी.पी.आर. लवकरच तयार होईल. असे सांगून खासदार जाधव यांनी संकल्पित नकाशा पत्रकारांना दाखवत अजूनही रेल्वेमार्गाचा आशावाद कायम असल्याचे चित्र उभे केले.खामगाव -जालना रेल्वेमार्गाचे आश्वासन देऊन लोकसभेच्या सलग तीन निवडणूका भाजपा-शिवसेना युतीच्या माध्यमातून जिंकलेल्या, आताच्या शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या 'त्या' विधानानंतर मोठी कोंडी झाली आहे. राजकीय क्षेत्रात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत तद्वतच खा.जाधवांची राजकीय शक्ती व प्रयत्न कमी पडल्याची जनभावना व्यक्त होत आहे.

लोकांचा हा रोष खासदार जाधवांच्या राजकीय भवितव्यासाठी मोठा अडसर ठरू शकतो. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी आपले राजकीय वजन वापरून जालना (दक्षिण मध्य रेल्वे) ते जळगाव (मध्य रेल्वे) अशा जोड मार्गाला गती दिल्याने तांत्रिक व आर्थिक दृष्ट्याही जालना-खामगाव असा मार्ग पटरीवर येण्याच्या आशाच आता संपूष्टात आल्या आहेत. दुहेरी खर्चाचा खटाटोप रेल्वे प्रशासन कशाला करेल? बुलढाणा जिल्ह्याचा एक बहूप्रतिक्षित 'ड्रिम प्रोजेक्ट' राजकीय स्वार्थापोटी दुस-या मार्गाने वळविला गेला आहे. उल्लेखनिय म्हणजे आक्टोबर २०१४ मध्ये खामगाव येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगाव-जालना रेल्वे मार्गाचे आश्वासन दिले होते. आता रेल्वेचा मार्ग बदलल्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात याचे राजकीय परिणाम जाणवणार आहेत.एकूणच या प्रकारामुळे शिंदे गटाच्या खासदार जाधवांसोबत भाजपाचीही कोंडी झाली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news