

वसमत, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अजब कारभार पहावयास मिळत आहे. जिवंत शेतकऱ्याला कागदोपञी मयत दाखवून लाभापासून वंचित ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वसमत तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी ,कर्मचाऱ्यांकडून जिवंत शेतकऱ्याला मयत दाखवल्याने त्या शेतकऱ्याला शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नाही. या अजब कारभाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी तालुका कृषी प्रशासन तसेच महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
कैलास मच्छिंद्र पुरी यांनी महाडीबीटी पोर्टलवर १९ जून २०२२ रोजी यांत्रिकी अंतर्गत नऊ फणी पेरणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रासह पोर्टलवर अपलोड केला होता. या संबंधित शेतकऱ्याने वारंवार ऑनलाईन अर्जाची छाननी केली असता सदरील अर्ज बाद केल्याचा रिमार्क पोर्टलवर नोंद करण्यात आला. याबाबत शेतकरी कैलास पुरी यांनी वारंवार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खेटा मारून सुद्धा त्यांना कुठलाही प्रतिसाद संबंधित तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या शासकीय कर्मचारी यांनी दिला नाही.