Rohit Pawar | पीकच उरलं नाही तर सहा हजारांचा भाव घेऊन करायचं काय? : रोहित पवार

उमरखेड येथील सभेत पवार यांची शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत देण्याची मागणी
Umarkhed Farmer Rally
रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी धोरणावर उमरखेड येथे जोरदार हल्लाबोल केला Pudhari
Published on: 
Updated on: 

Umarkhed Farmer Rally

उमरखेड : “सोयाबीनचा भाव सहा हजार रुपये झाला म्हणून काय उपयोग? शेतात सोयाबीनचे पीकच उरले नसेल तर हा भाव घेऊन करायचे काय?” असा खोचक सवाल उपस्थित करीत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या शेतकरी धोरणावर शुक्रवारी (दि.६) उमरखेड येथे जोरदार हल्लाबोल केला. अतिवृष्टी, पावसातील खंड आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, सरकारने तातडीने हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या सभेत पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षांत सोयाबीनचे उत्पादन चांगले असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळाला नाही. उत्पादन खर्च मात्र सातत्याने वाढला. खते, कीटकनाशके, डिझेल, बांधकाम, शिक्षण यासह प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढला; मात्र सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या भावात त्याप्रमाणे वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे.

Umarkhed Farmer Rally
Yavatmal News : लग्नाचे विधी पार अन् नवरी पसार! : यवतमाळमध्ये हळद लावून नवरदेवाला लाखोंचा चूना

“आज सोयाबीनला सहा हजारांचा भाव दिसत आहे; पण शेतात एक क्विंटलही सोयाबीन नसेल तर त्या भावाचा शेतकऱ्याला काय फायदा?” असा सवाल त्यांनी केला. गेल्या वर्षीचे नुकसान आणि यंदाच्या संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून, आता पुढचे वर्ष कर्ज काढून ढकलणेही कठीण झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील शेतकरी संकटाकडे लक्ष देण्याची जबाबदारी सरकारची आहे. शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी राजकीय सत्तासंघर्षाला प्राधान्य दिले जात असल्याची टीका पवार यांनी केली.

Umarkhed Farmer Rally
Yavatmal News | छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जमावबंदी; उमरखेड पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश

शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीकविमा आणि नुकसानभरपाईच्या माध्यमातून ठोस मदत मिळाली पाहिजे. “शेतकरी जगला तरच शेती, बाजारपेठ आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जगेल,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन उभारण्याचे संकेत दिले.

सभेला जिल्हाध्यक्ष प्राचार्य वर्षा निकम, विधानसभाध्यक्ष राजू जयस्वाल, प्रदीप देवसरकर, स्वप्नील कनवाळे, भास्कर पंडागळे, सरोज देशमुख, प्रियंका चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.