

Umarkhed Prohibitory Orders
उमरखेड : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील भारत पेट्रोल पंप हटविण्याच्या मागणीवरून विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने व उपोषणे केली. या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उमरखेड पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये लागू करण्यात आलेले हे आदेश ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
उमरखेड पोलीस ठाण्याच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील भारत पेट्रोल पंप हटविण्याच्या मागणीने आंदोलनाचे स्वरूप घेतले होते. विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी उपोषण व निदर्शने केली. आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात या मुद्द्यावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्बंध लागू केले आहेत.
प्रतिबंधात्मक आदेशानुसार, संबंधित परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास अथवा जमाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच लाठ्या, तलवारी, बंदुका, काठ्या, सुरे किंवा मानवी शरीरास इजा पोहोचविण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा वस्तू बाळगण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
याशिवाय, परिसरात उपोषण, धरणे, आंदोलने, निदर्शने, घोषणाबाजी आणि फलक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल, अशा कोणत्याही कृतीस परवानगी राहणार नाही.
शासकीय कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी, अन्य सुरक्षा रक्षक, शववाहिका तसेच पूर्वपरवानगीने काढण्यात येणाऱ्या विवाह सोहळ्यांच्या मिरवणुकांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सूट दिलेल्या व्यक्तींनाही निर्बंध लागू होणार नाहीत.
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सामाजिक सलोखा जपावा आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन उमरखेड पोलिसांनी केले आहे.