

यवतमाळ : लग्नाचे स्वप्न दाखवून नवरदेवाला आर्थिक गंडा घालणार्या कथित लुटारू नवरीला पुसद पोलिसांनी बीड जिल्ह्यातून अटक केली आहे. लग्नाचे नाटक, बनावट आधारकार्ड, खोटे नातेसंबंध आणि पैशांची मागणी अशा नियोजनबद्ध पद्धतीने एका तरुणाची दोन लाख 40 हजार रुपये व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह फसवणूक केल्याचा आरोप आहे.
सुनैना हेमंत कुरील (वय 20, रा. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसद शहर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत 27 ऑक्टोबर रोजी तिला बेड्या ठोकल्या. या प्रकरणात तिची आई ज्योती कुरील, सयाबाई शिंदे आणि दीपक सटवाजी ठमके या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती.
पुसद येथील मोर ज्वेलर्समध्ये नोकरी करणार्या अविवाहित तरुणाला दीपक ठमके याने लग्नासाठी मुलगी शोधून देण्याचे आश्वासन दिले. मुलीचे नातेवाईक असल्याचे भासवून काही जणांनी त्याचा विश्वास संपादन केला. दिवाळी 2025 च्या सुमारास त्याला कळमनुरी तालुक्यातील बोथी येथे नेऊन सुनैनाची मुलगी म्हणून ओळख करून देण्यात आली. सोबत आलेल्या व्यक्तींनी आपापसांत नातेसंबंध असल्याचे भासवून लग्नाची बोलणी पुढे नेली. 29 डिसेंबर 2025 रोजी आरोपींनी तरुणाच्या घरी येऊन लग्नासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर आणखी 40 हजार रुपये उकळण्यात आले.
याशिवाय सोन्याची पोत, मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आणि अन्य दागिनेही नवरीला देण्यात आले. या टोळीने राजस्थानमध्येही एका नवरदेवाला लग्नाचे आमिष दाखवून फसविल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संबंधित तरुणीविरुद्ध राजस्थानमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 18 फेब्रुवारीला या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुख्य आरोपी तरुणीला अटक झाल्याने या कथित विवाह फसवणूक प्रकरणातील आणखी धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.
विधी पार अन् नवरी पसार
लग्नासंदर्भातील धार्मिक विधी पार पडल्यानंतर नवरीने नवरदेवासोबत राहण्यास नकार दिला. कुटुंबीयांना भेटण्याचे कारण पुढे करून ती अन्य आरोपींसोबत निघून गेली. त्यानंतर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. आपली फसवणूक झाल्याचा संशय बळावल्यानंतर तरुणाने पुसद शहर पोलिसांत धाव घेतली. बनावट आधारकार्ड तयार करणे, खोटे नातेसंबंध दाखविणे आणि लग्नाचे आमिष देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रकरणात गुंतल्यास जातिवाचक शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचाही दावा तक्रारदाराने केला आहे.