यवतमाळ : ३८ विद्यार्थ्यांना अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून मिळाले ३९ लाख | पुढारी

यवतमाळ : ३८ विद्यार्थ्यांना अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून मिळाले ३९ लाख

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाची राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३८ विद्यार्थ्यांसाठी ३९ लाख ३० हजार ७३९ रुपये निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. हे अनुदान विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व, शस्त्रक्रिया, आजारी पडून किंवा सर्पदंशाने मृत्यू, जखमी झालेल्यांना वाटप करण्यात येणार आहे.

हा निधी शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या मार्फत लाभार्थीस एकाच हप्त्यात धनादेशाद्वारे लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात निश्चित कालावधीत जमा करण्यासाठी शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांच्या आदेशानुसार वितरित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे अपघातामध्ये निधन झाले असल्यास त्याच्या कुटुंबियाच्या बॅंक खात्यात धनादेशाव्दारे सानुग्रहाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. या प्राध्यान्यक्रमानुसार विद्यार्थ्यांची आई, विद्यार्थ्यांची आई हयात नसल्यास वडील, विद्यार्थ्यांची आई-वडील हयात नसल्यास वय १८ वर्षावरील भाऊ किंवा बहीण किंवा पालक पात्र असणार आहेत.

शालेय शिक्षण विभागामार्फत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास १ लाख ते ७५ हजार, अपघातातील जखमीवर शस्त्रक्रिया करावी लागल्यास दवाखान्याचा खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये, विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास १ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते. ही योजना पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालय (योजना) मार्फत या योजनेचा निधी वितरित केला जातो.

हेही वाचा :

Back to top button