छत्रपती संभाजीनगर : ब्रेक फेल झालेल्या ट्रकने ११ वाहनांना चिरडले; एक ठार, १८ जखमी

छत्रपती संभाजीनगर : ब्रेक फेल झालेल्या ट्रकने ११ वाहनांना चिरडले; एक ठार, १८ जखमी
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पैठण रोडवर उतरणाऱ्या भरधाव लोडिंग ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाला.  ब्रेक फेल झालेल्या या ट्रकने सात दुचाकी आणि चार चारचाकी वाहनांना चिरडले. या भीषण अपघातात एक महिला ठार तर १८ ते २० जण जखमी झाले. हा अपघात कांचनवाडी उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी (दि.१९) रात्री पावणेसातच्या सुमारास घडला. अपघातानंतर पैठण रोडवर तीन ते चार कि.मी. पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. मनिषा पद्माकर सिंगणापुरे (४०, रा. चितेगाव, ता. पैठण) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

या अपघातात शफिक शेख (रा. संजयनगर), इरफान शेख (रा. छावणी), अब्दुल बासिद (रा. वडगाव, ता. गेवराई), रहीम खान पठाण (संजयनगर), पिंटू बोर्डे (रा. प्रियदर्शनी), इंदिरा मगर, भगवान गव्हाणे (रा. जवाहर कॉलनी), मयूर लावरे (रा. पैठण गेट), ऋषीकेश चांगुलपाय (रा. नक्षत्रवाडी), माया बोर्डे, सायली दानवे, चंद्रकांत डांगरे, सायली डांगरे आदींचा जखमींमध्ये समावेश आहे. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत. जखमींना कांचनवाडीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरकडून धुळ्याकडे जाणारा ट्रक (क्र. एमएच २६, बीई १६४०) कांचनवाडी उड्डाणपुलाच्या बाजुने पैठण रोडवर उतरला. उतरताना या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. त्याचवेळी रस्त्याचे काम सुरु असल्याने पैठण रोडवर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या वाहनांना ट्रकने अक्षरश: चिरडले. ट्रकने सर्वात आधी इलेक्ट्रिक बाईक (क्र. एमएच २० जीडी ९४८७) ला उडविले. यात या बाईकचा पूर्णपणे चुराडा झाला. त्यानंतर ट्रक बोलेरो पिकअपवर (एमएच २०, ईजी १५६२) जाऊन धडकला. त्यामुळे पिकअप एका बाजुने उलटला. ताबा सुटलेला हा ट्रक एवढ्यावरच थांबला नाही. यासह दुचाकी व चारचाकी अशा  ११ वाहनांना या ट्रकने चिरडले. या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांचा फौजफाटा दाखल

अपघाताची माहिती मिळताच सातारा ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी, सहायक निरीक्षक पांडुरंग भागीले, उपनिरीक्षक सर्जेराव सानप, देविदास शेवाळे यांच्यासह वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अशोक थोरात, पोलिस निरीक्षक राजेश मयेकर, अमोल देवकर, सचिन इंगोले, सहायक निरीक्षक सचिन मिरधे आदी अधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला करून पैठण रोडवरील वाहतूक सुरळीत केली. साडेआठ वाजता ही वाहतूक सुरळीत झाली.

ठेकेदाराची चूक

पैठण रोडवर पाणीपुरवठा योजना आणि रस्त्याचे काम सुरु आहे. सायंकाळीही काम सुरु असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे एकाच जागी अनेक वाहने थांबलेली होती. ब्रेक फेल झालेला ट्रक या वाहनांमध्ये घुसला. त्यामुळे जास्त वाहने ट्रकने चिरडली. ठेकेदाराच्या चुकीमुळेच या अपघातात अनेक वाहने चिरडली गेली, असे स्थानिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news