जालना: मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार; पोलीस बंदोबस्त तैनात | पुढारी

जालना: मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार; पोलीस बंदोबस्त तैनात

अकबर शेख

शहागड: अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आंदोलनाते नेते मनोज जरांगे- पाटील शनिवारी (दि.२०) सकाळी ९ च्या सुमारास वडीग्रोद्री, शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने सकल मराठा समाज ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी, पायी मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील वडीगोद्री ते शहागडदरम्यान बॅनर झळकलेले आहेत. तर ठिकठिकाणी जरांगे- पाटील यांचे स्वागत होणार आहे‌.

दरम्यान, मराठ्यांच्या मोर्चासाठी जालना, संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील पोलीस दल सज्ज झाले आहे. जालना जिल्ह्यातील १० पोलीस निरीक्षक, २० सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षक, गृहरक्षक दलाचे १०० जवान, ५० महिला पोलीस, ८०० पोलीस कर्मचारी, २ रॅपिडक्शन पोलीस फोर्स तुकडी, असा कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आज वडीगोद्री येथे बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल, स्वयंसेवक राष्ट्रीय महामार्गावर ठेवले जाणार आहेत.

यावेळी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी, उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एल‌. घुसिंगे, मंडळ अधिकारी कृष्णा एडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक गणेश राऊत आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा 

Back to top button