नागपूर, पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी देशातील सर्व राज्यातील पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरीसाठी दिल्लीत पदक व प्रशस्तीपत्र पंतप्रधानांकडून दिले जातात. परंतु, यावर्षी महाराष्ट्रातून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एकीकडे महाराष्ट्र पोलीस यांची तुलना स्कॉटलंडच्या पोलिसांसोबत केली जाते. मात्र, पदक सूचीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश न करत मनोधैर्य खचवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा जाब द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाराज आहेत अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रकृती ठिक नसल्याचे आणि ते रुग्णालयात दाखल होऊ शकतात, असे म्हटले आहे. परंतु, मुख्यमंत्री कार्यालयात त्यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची काळजी सगळ्यांनाच आहे. नेमका हा सर्व संभ्रम संपविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली तब्बेत कशी आहे? हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.