

Washim Railway Station Murder Case
वाशिम : रेल्वे स्थानकाच्या निर्जन परिसरात एका हतबल व निराधार वृद्ध महिलेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. ९) सकाळी १० वाजता उघडकीस आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, वाशिम पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे.
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, पोलीस स्टेशन वाशीम शहर हद्दीतील रेल्वे स्टेशन परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा वाशीम, पोलीस स्टेशन वाशीम शहर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वाशीम यांची पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे निष्पन्न झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. गुन्ह्याची उकल करण्यासाठी विविध पथके तयार करून रवाना करण्यात आली. मृत महिला तसेच आरोपी दोघेही अनोळखी असल्याने ओळख पटवणे आव्हानात्मक होते. यासाठी माध्यम प्रतिनिधी तसेच गुप्त बातमीदारांना सक्रिय करण्यात आले.
संध्याकाळपर्यंत मृत महिला ही पंचशील नगर, वाशिम येथील असल्याचे निष्पन्न झाले. परिसरातील ४० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये एक संशयित दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त यंत्रणा सक्रिय करून आरोपीचा शोध सुरू केला. तपासात हा संशयित वाशिमचा रहिवासी नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रिसोड नाका मजूर अड्डा, बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात चौकशी करण्यात आली.
आरोपी गुन्हा केल्यानंतर रेल्वेने अकोला येथे गेला असण्याची शक्यता लक्षात घेऊन एक पथक अकोला येथे रवाना करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी हा दर्यापूर तालुका, जिल्हा अमरावती येथील एका गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. त्यानुसार त्याच्या गावात पथक पाठवण्यात आले; मात्र आरोपी काही दिवसांपासून गावात नसल्याचे समोर आले.
अखेर अकोला येथे तैनात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीपासून शोधमोहीम राबवत शनिवारी (दि. १०) अकोला रेल्वे स्टेशन परिसरात संशयित आरोपीला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केली असता संतोष रामराव खंडारे (वय अंदाजे ५०, रा. अडुळा बाजार, ता. दर्यापूर, जि. अमरावती) याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी वाशीम येथे आणण्यात आले.
ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, शहर पोलीस निरीक्षक संजय चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक योगेश बांगर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व वाशीम शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले.
या गुन्ह्याच्या उकलमध्ये पोलीस अंमलदार राजकुमार यादव, संदीप दुतोंडे, अमोल इरतकर व दीपक घुगे यांचे विशेष योगदान राहिले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अरुण नागरे, पोलीस स्टेशन वाशीम शहर हे करीत आहेत.