

Washim Elderly Woman Assaulted
वाशिम : ज्या शहराला संतांची आणि संस्कारांची भूमी म्हटले जाते, त्याच वाशिम शहराला एक काळिमा फासणारी घटना घडली आहे. वाशिम रेल्वे स्थानकाच्या निर्जन परिसरात, एका ६० वर्षीय हतबल आणि निराधार वृद्ध महिलेवर अज्ञात नराधमांनी केवळ पाशवी अत्याचारच केला नाही. तर तिचा जीवही घेतला. माणुसकीला शरम आणणारी ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. ९) सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे.
भिक्षा मागून आपल्या आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करणाऱ्या त्या वृद्धेला काय ठाऊक होते की, आजची रात्र तिच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरेल? घटनास्थळाचे दृश्य भीषण होते. तिथे पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि नशा करण्यासाठी वापरलेले अमली पदार्थ ओरडून सांगत होते की, नशेत धुंद झालेल्या काही सैतानांनी त्या माऊलीचे लचके तोडले आहेत. साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या त्या वृद्धेच्या असहायतेचा फायदा घेऊन, नराधमांनी आधी तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिची क्रूरपणे हत्या केली.
नशाखोरांच्या विळख्यात रेल्वे स्थानक परिसर
वाशिम रेल्वे स्थानक परिसर आता सामान्य प्रवाशांसाठी उरला नसून तो गांजा आणि दारू पिणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचा अड्डा बनला आहे, हे आजच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. रात्रीच्या काळोखात हे नशाखोर नरभक्षक बनून निराधार वृद्धांना लक्ष्य करत आहेत, हे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एका निराधार वृद्ध महिलेला साधी सुरक्षितता देऊ न शकणारे प्रशासन आता तरी या नशाखोरांचा बंदोबस्त करणार का? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो वृद्धेचा मृतदेह पाहून उपस्थित प्रत्येक जण हेलावून गेला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.