वाशिम : तेंदूपत्ता माफीयांचा वनविभागाला लाखोचा चुना! | पुढारी

वाशिम : तेंदूपत्ता माफीयांचा वनविभागाला लाखोचा चुना!

वाशिम; अजय ढवळे : मालेगाव तालुक्यातील माळेगाव आणि धरमवाडी जंगलातील तेंदूपत्याची माफीयांकडून मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याची बाब उघडकीस आली आहे़. या गंभीर प्रकारामुळे शासनाचा लाखो रूपयाचा महसूल बुडत आहे. परिणामी आदिवासी बांधवांच्या लाखो रूपयाच्या मजुरीवर घाला घातला जात आहे़. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तेंदूपत्ता माफीयांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी बांधवाकडून होत आहे.

मालेगाव तालुक्यात जंगलातील तेंदूपत्ता तोडून शासनाने नेमून दिलेल्या जागेवरच म्हणजे ज्या जागेवर तेंदूपत्ता ठेवण्याची परवानगी दिली त्याच जागेवर तो ठेवला गेला पाहिजे, असे वनविभागाच्या नियमात आहे. वनविभागाच्या नियमांची पायमल्ली केल्यास संबंधीत व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येते. परंतु, काही तेंदूमाफीयांनी अकोला बार्शिटाकळी आणि परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या हद्दीमध्ये त्या जागेचा परवाना नसतानासुध्दा वन विभागाच्या जमिनीचा आणि संपत्तीचा वापर करत असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. जंगलामधील संपत्ती अवैधरित्या संकलीत करून त्यातून लाखो रूपयांचा गोरखधंदा करीत असल्याचे वास्तव आहे. या प्रकाराची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामे करावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जंगल परिसरातील आदिवासी मजूर बांधवांकडून होत आहे़. यासंदर्भात वनअधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

हेही वाचा : 

Back to top button