पाळीव प्राण्यांच्या नियमावलीसाठी पुढाकार; आरोग्य विभागाचे पत्र | पुढारी

पाळीव प्राण्यांच्या नियमावलीसाठी पुढाकार; आरोग्य विभागाचे पत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच पाळीव प्राण्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. पाळीव प्राण्यांची अधिकृत नोंद राहावी, यादृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाने परवाना काढण्याचा नियम यापूर्वी लागू केला आहे. पाळीव प्राण्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डला पत्र लिहिण्यात आले आहे.

हडपसरमध्ये एका घरामध्ये एका महिलेने विनापरवाना 11 मांजरी पाळल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रार नोंदवली होती. पाळीव प्राण्यांमुळे होणार्‍या उपद्रवाबाबत नागरिकांकडून आरोग्य विभागाकडे अनेक तक्रारी येत असतात. प्रत्येक घरात किती पाळीव प्राणी असावेत, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यास पाळीव प्राण्यांचे मालक आणि इतर नागरिक यांच्यातील संघर्षाबात तोडगा काढणे शक्य होईल, असे आरोग्य विभागाने पत्रात लिहिले आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंदे म्हणाल्या, ’नागरिकांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांची महापालिकेकडे नोंदणी करून वार्षिक परवाना घेण्याची नियमावली लागू केली आहे. मात्र, अजूनही नियमांची पूर्ण अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. एकाच घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी ठेवले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे याबाबत ठोस धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वांची गरज निर्माण झाली आहे.’

रहिवासी, पाळीव प्राणी आणि त्यांचे मालक यांच्यामध्ये संतुलित आणि सुसंवादी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये किती पाळीव प्राणी असावेत, याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक आहेत. यामुळे अनेक समस्या सुटण्यास मदत होईल.

– डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

हेही वाचा

Back to top button