

वर्धा: जिल्ह्यातील मांडवा येथे स्मार्ट मीटरला नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. नागरिकांनी एकमताने ग्रामसभेमध्ये स्मार्ट मीटर लावण्याला विरोध केला. तसा ठरावच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. वीज कंपनीतर्फे गावामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
टप्प्याटप्प्याने हे मीटर लावण्यात येऊन यानंतर त्यामध्ये रिचार्ज करून वीज विकत घ्यावी लागेल. त्यामध्ये सिम असल्यामुळे सुरुवातीला ते ग्राहकांना बिल देतील व त्यानंतर तेच मीटर पोस्टपेड किंवा प्रीपेड करतील. त्यातील रिचार्जनुसार वीज ग्राहकाला उपलब्ध होईल, असे सांगण्यात येते. त्यास अनेक ठिकाणी विरोध होत आहे.
स्मार्ट मीटर लावल्यामुळे जे व्यक्ती एका महिन्यात किती युनिटचा वापर केला आहे ते पाहण्यासाठी येतात, त्यांची सुद्धा गरज भासणार नाही. त्यामुळे युनिटचे रीडिंग घेण्यासाठी येणारे अनेक लोक बेरोजगार होतील. मांडवा ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत हा मुद्दा मांडण्यात आला. गावात स्मार्ट मीटर लावायचे नाही, असा ठराव मांडवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला.
स्मार्ट मीटरला विरोध करण्याचा ठराव हा गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मांडला. यावेळी विठ्ठल वाघ, गंगाधर मेघे, उत्तम परिमल, गोपाळ लादे, नागोराव चिकराम, सुधाकर मेश्राम, मंगेश काळे, दिनेश मसराम, प्रमोद उकेबोन्द्रे, प्रदीप रामटेके, किसना बावणे, चंद्रशेखर परिमल यांनी हा ठराव मांडला. स्मार्ट मीटरला ठिकठिकाणी विरोध होत आहे, पण ग्रामपंचायतीने प्रथमच स्मार्ट मीटरला विरोध दर्शवणारा ठराव घेतल्याचे दिसते.