

Hospital store room fire
वर्धा : वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोनच्या दुसर्या माळ्यावर स्टोअर रुममध्ये अचानक आग लागली. या घटनेमुळे एकच धावपळ झाली. मंगळवारी (दि. २३) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्याचे निदर्शनास येताच कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत इमारतीच्या भागातील रुग्णांसह त्यांच्या नातलगांना सुरक्षितपणे दुसरीकडे स्थलांतरित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोनमध्ये स्टोअर रुममधून धुराचे लोळ दिसू लागले. आग लागल्याच लक्षात येताच उपस्थित कर्मचार्यांनी धावपळ करत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली. मात्र आग आटोक्यात येत नसल्याचे निर्शनास आल्याने कर्मचार्यांनी तातडीने दोन्ही विभागात असलेल्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातलगांना सुरक्षित बाहेर काढण्यास सुरूवात केली. येथील १० रुग्ण तसेच नातलग, कर्मचारी आदी जवळपास ३३ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
रुग्णांना सुरक्षित बाहेर काढून दुसर्या वॉर्डात स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान, याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वर्धा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने रुग्णालय गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली. वर्धा, देवळी, सेलू येथील अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आगीमध्ये सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही. आगीमध्ये साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार ताले, रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार भुसारी, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार संदीप पुंडेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुमंत वाघ तसेच सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
आग लागल्याचे लक्षात येताच कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरूवात केली. उपस्थित कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता रुग्ण तसेच त्यांच्या नातलगांना जवळपास ३३ जणांना तातडीने तेथून सुरक्षित बाहेर काढले. तसेच त्यांना सुरक्षित दुसर्या वॉर्डात स्थलांतरित केले. कर्मचार्यांच्या प्रसंगावधानाने वेळीच मदत कार्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेची माहिती मिळताच देवळी-पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात भेट दिली. त्यांनी आग लागलेल्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करत रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. उपचार व्यवस्थेबाबत प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी आमदार बकाने यांनी उपस्थित अधिकार्यांशी चर्चा करून आगीचे नेमके कारण, नुकसानाची माहिती तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा घेतला.
रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था व आपत्कालीन नियोजन अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रसंगी आरोग्य सह संचालक डॉ. शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वाघ, वर्धा उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, वर्धा तहसीलदार सागर पुंडेकर, नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.