

वर्धा: आर्वी तालुक्यातील खरांगणा (मोरांगणा) वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या गावांमध्ये शेतशिवारात रानडुकरांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. रानडुकरांच्या उपद्रवाने तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
अनेक शेतकर्यांच्या शेतातील तुरीचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे शेतकर्यांची काळजी वाढलेली आहे. या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.
तुरीचे पीक आता बहरात आहे. तुरीला मोठ्या प्रमाणात फुल तसेच शेंगा लागलेल्या आहेत. लवकरच पीक काढणीला येणार आहे. तुरीचे पीक बहरत असताना रानडुकरांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. रानडुकरांच्या उपद्रवाने तुरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही शेतात तर धुडगूस घालून रानडुकरांनी तुरीसोबतच कपाशीचेही नुकसान केले आहे. या नुकसानीने शेतकर्यांना धडकी भरलेली आहे. आधीच अडचणी असताना रानडुकरांच्या उपद्रवाने होत असलेल्या नुकसानीने शेतकर्यांच्या समस्येत अधिकच भर पडलेली आहे. काय उपाययोजना कराव्यात, असा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत आहे.
कपाशी, उस यासारख्या पिकात रानडुक्करांचे कळप लपून राहत असल्याची शक्यता असल्याने शेतकर्यांना शेतात जातानाही विचार करावा लागत आहे. वनविभागाने याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. खरांगणा, मोरांगणा, काचनूर, दहेगाव यासोबतच इतरही शेतशिवारात रानडुकरांचा उपद्रव वाढलेला आहे. मध्यंतरी रानडुकरांनी कपाशीचे अतोनात नुकसान केल्याची प्रकरणे समोर आली होती. आता रानडुकरांच्या उपद्रवाने तुरीसोबतच इतर पिकांचे नुकसान होत आहे.
आधीच शेतकरी अडचणीत आहेत. हे नुकसान तर शेतकर्यांच्या विचारापलिकडे आहे. असेच नुकसान होत राहिले तर शेती कशी करायची, आर्थिक नियोजन कसे कराये, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. नुकसानीची पाहणी करून रानडुकरांचा बंदोबस्त करत शेतकर्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून करण्यात येत आहे.