

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू' राबवत वर्धा जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या विरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत डीआरआयने कारंजा (घाडगे) तालुक्यातील जंगलात लपवून चालविल्या जाणाऱ्या मेफेड्रोन ड्रग निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत तब्बल १२८ किलो मेफेड्रोन ड्रग जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १९२ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा (घाडगे) तालुक्यातील एका निर्जन भागात मेफेड्रोनची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती.
त्यानुसार पथकाने छापा टाकला. यावेळी घटनास्थळावरून अधिकार्यांनी १२८ किलो तयार मेफेड्रोन आणि २४५ किलो कच्चे साहित्य जप्त केले. यासोबतच ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे रिअॅक्टर्स, मोठी भांडी आणि इतर उपकरणेही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी डीआरआयने तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांवरही 'एनडीपीएस' कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास सुरू आहे.