अमरावती, पुढारी वृत्तसेवा : खुल्या प्लॉटच्या जागेवरून शेजाऱ्याने आई व मुलाची सबलीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मंगलधाम परिसरातील बालाजी नगरात सोमवारी (दि.२९) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. कुंदा देशमुख व सुरज देशमुख अशी मृतांची नावे आहेत. वडील विजयराव देशमुख हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर आरोपी देवानंद लोणारे परिवारासह फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह डॉग स्कॉड, फॉरेन्सिक एक्सपोर्ट घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथे विजयराव देशमुख हे त्यांची पत्नी कुंदा देशमुख आणि मुलगा सुरज देशमुख यांच्यासह वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक दिवसापासून दोन प्लॉटमध्ये असलेल्या रिकाम्या जागेवरून त्यांचा शेजारच्या देवानंद लोणारे याच्याबरोबर वाद होता. सोमवारी (दि.२९) सकाळी देखील दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाला. दरम्यान आरोपी देवानंद लोणारे हा आज सायंकाळी देशमुख यांच्या घरात गेला. व रागाच्या भरात त्याने त्यांचा मुलगा सुरज देशमुख याच्या डोक्यावर सबलीने वार केला. हे पाहताच सुरजची आई कुंदा देशमुख यांनी मुलाला वाचविण्यासाठी धाव घेतली असता आरोपीने त्यांच्या डोक्यावर देखील वार केला. मुलाचा आरडाओरडा ऐकून वडील विजयराव देशमुख हे आल्याने त्यांना देखील आरोपी लोणारे याने मारहाण केली. या हल्ल्यात लोखंडी सबलीचा जबर मार लागल्याने सुरज देशमुख आणि त्याची आई कुंदा देशमुख हे रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले होते. दरम्यान शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता आरोपीने त्यांना सबलीचा धाक दाखविला आणि घटनास्थळावरून आपल्या परिवारासह पळ काढला.
स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर डीसीपी कल्पना बारावकर आणि सागर पाटील यांच्यासह फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गंभीर जखमी असलेल्या सुरज देशमुख, कुंदा देशमुख आणि विजयराव देशमुख यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर इजा होऊन अति रक्तस्त्राव झाल्याने मुलगा सुरज देशमुख व आई कुंदा देशमुख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. वडील विजयराव देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पाचारण केले आहे. परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले जात आहे.
हेही वाचा :