

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : आयपीएल क्रिकेटचा हंगाम यंदा जोरात सुरू आहे. जिल्ह्यात क्रिकेट सट्टाबाजांकडून यावर जुगार खेळला जातो. पुसद शहरातही शनिवारी चेन्नई सुपरकिंग व दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या मॅचवर बेवलिंकद्वारे सट्टा खेळला जात होता. याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली. त्यावरून सापळा रचत दोघांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून ६२ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रवी मंगलचंद कळमकर (वय ३७, रा. मधुकरनगर, पुसद) तसेच मुखतार खान गफ्फार खान (वय ३८, रा. रेहान पार्क, दुधे- लेआउट पुसद) हे दोघे शहरातील मंगलमूर्तीनगर येथे क्रिकेट सट्टा घेत होते. त्यांनी मोबाइल फोनवर वेबलिंकच्या माध्यमातून पैसे मागवून घेत मॅचवर जुगार खेळ सुरू केला होता. पोलिसांच्या पथकाने त्यांचा शोध घेऊन मॅच सुरू असताना त्यांना अटक केली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सागर भारस्कर, जमादार सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, सुनील पंडागळे, मोहंमद ताज यांनी केली. आरोपींविरोधात पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन आरोपीं व्यतिरिक्त इतरही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा