

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पंचायत समितीतील अधिकारी असल्याची बतावणी करत दोघांनी तुम्हाला पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यासाठी ७५ हजार रुपये भरावे लागेल असे सांगितले. घरी एकट्या असलेल्या महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्याजवळून एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला. बाभूळगाव तालुक्यातील वेणी येथे हा प्रकार घडला. साधना रामदास राऊत (रा. वेणी) असे फसवणूक झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे.
साधना राऊत या घरी एकट्या असताना दोघेजण शुक्रवारी (दि.१९) सकाळीच घरी आले. त्यांनी तुम्हाला बैलबंडी व शेत कुंपनासाठी पाच लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी तत्काळ ७५ हजार रुपयांचा भरणा करा अशी बतावणी केली. मात्र साधना राऊत यांनी माझ्याकडे केवळ पाच हजार रुपये आहे. आता उर्वरित ७० हजार रुपये देवू शकत नाही. थोड्या दिवसानंतर ७५ हजारांची जुळवाजुळव शक्य असल्याचे सांगितले. त्यासाठी सोन्याची पोत गहाण ठेवावी लागणार असल्याचेही त्यांनी भामट्यांना सांगितले. यावर त्या दोघांनी ती पोत आम्हाला द्या, पैसे भरण्याची गरज नाही, असे म्हणून फिर्यादीस विश्वासात घेवून तिच्याजवळून एक लाख २० हजार रुपयांची सोन्याची पोत व रोख पाच हजार असा एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल घेवून पळ काढला.
घरची मंडळी परत आल्यानंतर महिलेने सांगितलेला प्रकार ऐकून सर्वांना धक्काच बसला. शासकीय अधिकारी बनून आलेल्या दोघांनी सव्वालाखांना फसविले. या प्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक वाचा :