

घाटंजी (जि. यवतमाळ): पुढारी वृत्तसेवा : घाटंजी तालुक्यालगतच्या वडगाव (जंगल) वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत येळाबारा भागातील रोहटेक येथे वाघाने कालवडीची शिकार केली. अजय ठाकरे यांच्या शेतात प्रकाश किसनराव काकडे (रा. येळाबारा) यांच्या मालकीची २/३ वर्षाच्या कालवडीची शिकार झाल्याने येळाबारा भागात वाघाची दहशत पसरली आहे.
येळाबारा शिवारात रोहटेक, रामगाव इत्यादी शिवारात ओलीताची शेती आहे. त्यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी भटकत असतात. दरम्यान, रविवारी रोहटेक येथील अजय ठाकरे यांच्या शेतात प्रकाश काकडे यांच्या मालकीची २/३ वर्षाच्या कालवडीची वाघाने शिकार केल्याची चर्चा येळाबारा परिसरात सुरु होती. त्यामुळे येळाबारा वन क्षेत्र सहाय्यक डी. बी. महेशकर, वाकीचे प्रभारी वनरक्षक पी. एस. बाजपेयी यांनी कालवडीचा शेतात जाऊन घटनास्थळ पंचनामा केला. विशेष म्हणजे, घटनास्थळी वाघाच्या पंजाचे पगमार्क सुद्धा मिळाले आहेत.
घाटंजी तालुक्यातील टीपेश्वर अभयारण्य, इंझाळा जंगल, लव्हाणा शिव आदीं जंगलातून पाण्यासाठी वाघ, बिबट आणि इतर हिंस्त्रपशू पाण्यासाठी भटकत असतात. तसेच टीपेश्वर अभयारण्यात वाघांची संख्या अधिक असल्याने व तेथील जंगल भाग कमी पडत असल्याने टीपेश्वर अभयारण्यातील वाघ, बिबट इतर प्राणी इंझाळा, पाटापांगरा, येळाबारासह जंगलात शिकारीसाठी भ्रमंती करत असतात. विशेषतः या पुर्वी इंझाळा जंगलात एक बिबट मृतावस्थेत आढळला होता. तर पाटापांगरा जंगलात वाघाने शिरकाव केल्याने या भागात वाघाची दहशत निर्माण झाली होती.
दरम्यान, येळाबारा वन क्षेत्र सहाय्यक कार्यालयाअंतर्गत चार वर्षात सदर घटना प्रथमच घडली आहे. सदर प्रकरणाचा चौकशी अहवाल वडगांव (जंगल) येथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आल्याचे वन क्षेत्र सहाय्यक डी. बी. महेशकर यांनी सांगितले. ( वाघाने केली कालवडीची शिकार )
हेही वाचलंत का?