नागपूर : ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू H3N2 ने नाही; मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल

नागपूर : ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू H3N2 ने नाही; मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : लक्ष्मीनगर झोनमधील ७२ वर्षीय रुग्णाचा झालेला मृत्यू हा इन्फ्लुएंझा H3N2 ने झालेला नाही, असा अहवाल इन्फ्लुएंझा H3N2 मृत्यू अन्वेषण समितीने आज दिला आहे. 'डेथ ऑडिट' अर्थात मृत्यू विश्लेषण समितीची बैठक मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या बैठकीत डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर डॉ. दीपक सेलोकर, जिल्हाशल्य चिकित्सक मेयो रुग्णालय, डॉ. रविन्द्र खडसे, प्राध्यापक सूक्ष्मजीव शास्त्र विभाग, डॉ. प्रवीण सलामे, सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यकशास्त्र विभाग, डॉ. गोवर्धन नवखरे, नोडल वैद्यकीय अधिकारी साथरोग विभाग, मनपा, डॉ. शबनम खान, मुख्य वैद्यकीय अधिकारी, खाजगी रुग्णालय उपस्थित होते.
दि. २ मार्च २०२३ रोजी श्वास घेण्यास त्रास, ताप व खोकला असल्यामुळे या ७२ वर्षीय पुरुष रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराने रुग्णाची प्रकृती सामान्य झाल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य कक्षात हलविण्यात आले.

मात्र, दि. ६ मार्च रोजी या रुग्णाला श्वास घेण्यास परत त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. यासोबतच त्यांचा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. यामध्ये त्यांच्या फुफ्फुसात अनेक जिवाणु व विषाणुचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये काही जिवाणु हे प्रतिजैविकास प्रतिसाद न देणारे होते. या सर्वांचा परिणाम वाढत जावून दि ९ मार्च रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. रूग्णाचा एक्सरे रिपोर्ट, सहव्याधी व अनेक प्रकारचे संसर्ग लक्षात घेता या रुग्णाचा मृत्यू हा H3N2 या संसर्गामुळे झाल्याचे दिसून येत नाही, असा अभिप्राय मृत्यू विश्लेषण समितीने एकमताने दिला आहे.

मृत्यू विश्लेषण समितीने H3N2 नियंत्रण व उपाययोजनासाठी सर्व खासगी तसेच शासकीय रुग्णालयात भरती होणाऱ्या संशयित रुग्णाचे H1N1 सोबत H3N2 तपासणी करणे, खासगी तसेच शासकीय प्रयोगशाळामध्ये H1N1 व H3N2 ची तपासणी सोय उपलब्ध करणे, शासकिय व खासगी रूग्णालयात संशयित रुग्णाकरिता विलगीकरण कक्ष तयार ठेवणे, सर्व शासकिय व खासगी रुग्णालयांनी H1N1 व H3N2 रुग्णांची माहिती आरोग्य विभागास नियमितपणे देण्याचे निर्देश दिले आहेत.

ही काळजी घ्या :

  • हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
  • गर्दीमध्ये जाणे टाळा
  • रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा
  • खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा
  • भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या
  • पौष्टीक आहार घ्या

हे टाळा :

  • हस्तांदोलन अथवा आलिंगन
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news