नितीन गडकरी : मॉईलने मॅगनीज उत्‍पादनात वाढ करून निर्यात करावी

नितीन गडकरी : मॉईलने मॅगनीज उत्‍पादनात वाढ करून निर्यात करावी

मॅगनीज ओर इंडिया लिमिटेड-मॉईलने मॅगनीज उत्पादनांमध्ये वाढ करुन त्याची निर्यात केली पाहिजे. यातून भारताला आत्मनिर्भर बनवले पाहिजे. यासाठी एकत्रित वृत्तीने कामगार संघटना तसेच मॉईल कंपनी यांनी मिळून काम करावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरीरी यांनी केले. स्थानिक हॉटेल ली-मेरिडियन येथे केंद्रीय स्टील मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मॉईलच्या वतीने चिकला खाण येथे दुस-या व्हर्टिकल शाफ्टचे लोकार्पण, चिकला, गुमगाव, डोंगरीबुजुर्ग, तिरोडी आणि कांद्री या पाच खाणींच्या ठिकाणी रुग्णालयांचे उद्घाटन तसेच तिरोडी खाणीतील प्रशासकीय इमारत आणि बालाघाट खाणीतील जीटी (ग्रेज्युएट ट्रेनी) वसतिगृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री नितीन गडकरींकडून राष्ट्रीय एकतेची शपथ…

या प्रसंगी केंद्रीय स्टील रामचंद्र प्रसाद सिंह, राज्याचे पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे, मॉईलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मुकुंद पी. चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेची शपथ उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमात केंद्रीय स्टील मंत्र्यांनी मॉईलच्या कर्मचाऱ्यांना उत्पादन आधारित बोनस म्हणून २८ हजार रुपये दिवाळीच्या अगोदर देण्याची घोषणा केली. तसेच १ ऑगस्ट २०१७ पासून ते पुढील दहा वर्षाकरिता म्हणजेच ३१ जुलै २०२७ पर्यंत वेतन सुधारणा प्रस्तावाला देखील मान्यता दिली. यामूळे कंपनीच्या ५८०० कर्मचा-यांना तसेच कामगारांना लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कर्मचारी संघटनांच्या या २० वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या केंद्रीय स्टील मंत्री आर. पी. सिंह यांनी विशेषरित्या मान्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच या मागण्या मान्य केल्यानंतर आता कर्मचारी संघटनांनी १४ लक्ष मेट्रिक टन स्टीलचे वार्षिक उत्पादन वाढवावे असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

मानव संसाधन विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशील असायला हवे : गडकरी

कर्मचारी संघटनांच्या समस्या व मागण्या बद्दल आपल्याला पूर्ण कल्पना आहे. कंपन्यांच्या मानव संसाधन विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशील असायला हवे असेही गडकरी यांनी सांगितले. फायनान्शिअल ऑडिट पेक्षा परफॉर्मन्स ऑडिट हे महत्त्वाचा आहे असे सांगून त्यांनी कामगारांना एकत्रित येत जोमाने काम करावे असे आवाहन केले. ऑटोमोबाइल इंडस्ट्री, इथेनॉल या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रीन हायड्रोजनची आवश्यकता आहे. स्टील उद्योगांमध्ये सुद्धा कोकिंग कोलच्या ऐवजी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याची ही वेळ आहे असेही त्यांनी नमूद केले.

केंद्रीय स्टील मंत्री आर. पी. सिंह यांनी राष्ट्रीय स्टील पॉलिसी २०१७ नुसार स्टीलचे ३०० मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असून, ते साध्य करण्यासाठी मॉईलच्या खाणीचे व्यवस्थापन, पर्यावरण विषयक परवानग्या, या संदर्भात आराखडा आवश्यक आहे. कामगारांचे मनोबल वाढण्याच्या दृष्टीने मानव संसाधन विभागाच्या धोरणात सुद्धा बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भारतात ७२ हजार कोटी रुपयांच्या कोकींग कोलची आयात होत असून, याला पर्याय म्हणून हायड्रोजनसारख्या हरित उर्जेची आवश्यकता आहे, असेही सिंह यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news