

नागपूर: नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे उपराजधानीतील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. दुसरीकडे, अमरावती जिल्ह्यात मेघा नदीला पूर आला असून, वर्ध्यातही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी शहरी भागांत मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
नागपूरला आज (दि.२६) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान नागपूरसह पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागपूर शहरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आहे. विशेषतः मनीष नगर येथील रेल्वे अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, नागरिक आपला जीव धोक्यात घालून या पाण्यातून वाहने काढत आहेत. सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्यांची मोठी गर्दी असल्याने, अनेक स्कूल बस आणि दुचाकीस्वार धोकादायकरित्या या पाण्यातून मार्गक्रमण करत असल्याचे चित्र दिसून आले. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. येथील शिरजगाव कसबा परिसरातून वाहणाऱ्या मेघा नदीला पूर आला असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. परिसरातील अनेक लहान-मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वर्धा जिल्ह्याला हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला असून, जिल्ह्यात शुक्रवार (दि.२५) रात्रीपासून कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. हा पाऊस शेतीपिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, सकाळपासून पावसाच्या सरी बरसत असल्याने अनेक कामांचा खोळंबा झाला आहे. जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून, वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे.
हवामान विभागाने नागपूरसह पूर्व विदर्भात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि सखल भागांतून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.