

धनराज गोपाळ
पोलादपूर: तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. तालुक्यात १४५ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली असून, महाबळेश्वर घाटमाथ्यावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीचे पाणी पोलादपूर शहरात आणि बाजारपेठेत शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली असून, नदीकाठच्या गावांना हाय-अलर्ट जारी केला आहे.
रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे सावित्री नदीने रौद्र रूप धारण केले आहे. शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास नदीचे पाणी पोलादपूर शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली. माहिती मिळताच तहसीलदार कपिल घोरपडे यांच्यासह पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी सवाद गावाच्या परिसरातही पाणी शिरल्याने श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम आणि पोलीस प्रशासनाने तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलादपूर नगरपंचायतीमार्फत सायरन वाजवून नागरिकांना सतर्क करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात काही ठिकाणी रस्त्यावर माती आणि लहान दरडी आल्या आहेत. मात्र, आपत्कालीन पथकाच्या माहितीनुसार, रस्ता लहान वाहनांसाठी खुला ठेवण्यात यश आले आहे. दरम्यान, मोरझोत धबधब्याजवळ रस्त्यावर दरड कोसळल्याची माहिती मिळताच तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तात्काळ जेसीबी पाठवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे आदेश दिले.
भारतीय हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवल्याने जिल्हा प्रशासनाने महाड आणि पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सावित्री नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या भागांतील नागरिकांनी आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची तयारी ठेवावी. गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या पोलादपूर तहसील प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीमसारखी पथके परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. "नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे," असे आवाहन महसूल आणि पोलीस प्रशासनाने केले आहे.