

नगर: जिल्ह्यातील काही भागात शनिवारी व रविवारी मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आलेला आहे. पुणे, नाशिक या जिल्ह्यांतदेखील मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने भीमा, गोदावरी, प्रवरा, सीना तसेच हंगा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोतूळ येथून मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने ‘मुळा’सह सर्वच नद्यांच्या काठावरील जनतेला सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन दिवसांपासून कुठेतरी रिमझिम होत आहे. शनिवारी मुसळधार, रविवारी मध्यम तर सोमवारी व मंगळवारी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे नदीपात्रांतील पाणीपातळीत वाढ होऊन नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. (Latest Ahilyanagar News)
दरम्यान, नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. मेघगर्जनेच्या वेळी वीज चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा जवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यास नदीपात्रावरील पुलांवरून जाऊ नये, जुनाट व मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आदी आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी जनतेला केले आहे.