नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या श्री. आयुर्वेद महाविद्यालयात भरड धान्यावर आधारित तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी भरड धान्याची खाद्य उत्पादने लोकप्रिय व्हावीत अशी अपेक्षा गडकरी यांनी बोलून दाखविली.
संबंधित बातम्या
भरडधान्याच्या पाककृती या लोकांच्या पसंतीस उतराव्यात, भरडधान्याच्या पोषक मूल्यांच्या महत्त्वाच्या खाद्य उत्पादनाच्या पाककृतीची चव चांगली व्हावी यासाठी संशोधन संस्थांनी परस्पर समन्वय साधून प्रयत्न करावेत यावर भर दिला. श्री. आयुर्वेद महाविद्यालयात 'जीवन शैलीतील व्याधींच्या प्रबंधन आणि व्यवस्थापनात भरड धान्याची भूमिका' या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे उद्घाटन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्र शासनाने यंदाचे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य वैद्य ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.
ज्ञानाची प्रासंगिकता ही त्याच्या व्यवहारिक उपयोगावर असते, असे सांगत भरड धान्याच्या पोषण मूल्यासंदर्भात केवळ संशोधन पत्रिकेत चर्चा न करता त्या धानाच्या पाककृती लोकप्रिय होण्यासाठी पाकविधीमध्ये ज्या बदलांची आवश्यकता आहे, ते बदल समाविष्ट करून या भरड धान्याच्या पाककृती उत्तमरित्या तयार करणे आणि त्याचे ब्रॅण्डिंग करणे आवश्यक आहे. खाद्य तंत्रज्ञानाच्या महाविद्यालयासोबत आयुर्वेद महाविद्यालयाने सुद्धा सामंजस्य करार करून या भरडधान्याच्या प्राककृती विकसित करण्याबाबत धोरण आखावे असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे.
भरड धान्यांमध्ये प्रथिने आणि कर्बोदके यांचे प्रमाण जास्त आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या जी-२० च्या परिषदेत सर्व देशांच्या प्रमुखांना भरड धान्याचे पदार्थ देण्यात आले असे देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.