Graduate Constituency Election Nagpur : भाजपच्या पदवीधर उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच!

कोहळे, दिवे, राऊत, रेवतकर, देशमुख, सोले यांच्या नावांची चर्चा; तिकीट कोणाच्या गळ्यात?; जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी की अनुभवी नेत्यावर पुन्हा विश्वास?
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. पक्षाने मतदार नोंदणी अभियानासह निवडणुकीची तयारी मिशन मोडवर सुरू केली असतानाच, उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आल्याने पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. माजी आमदार सुधाकर कोहळे, सुधीर दिवे, विजय राऊत, किशोर रेवतकर, गिरीश देशमुख आणि माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या नावांची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

BJP
Graduate Constituency Election : पदवीधरसाठी 2 लाख 40 हजार मतदार नोंदणी

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. गंगाधरराव फडणवीस यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, २०२० मध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी भाजपचा हा गड भेदला. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही जागा पुन्हा ताब्यात घेणे भाजपसाठी प्रतिष्ठेचे बनले आहे.

BJP
Sambhajinagar Graduate Constituency | छत्रपती संभाजीनगर पदवीधर : मानवत तालुका मतदार यादीवर 'या' तारखेपर्यंत हरकती सादर करता येणार

मतदार नोंदणीच्या निमित्ताने दावेदार सक्रिय

भाजपने पदवीधर मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू केली असून या अभियानाची प्रमुख जबाबदारी माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्याकडे, तर सुधीर दिवे यांच्याकडे सहप्रमुख म्हणून देण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास दोन लाख मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती आहे. या अभियानात सक्रिय असलेल्या नेत्यांच्या नावांचीच उमेदवारीसाठी चर्चा होऊ लागल्याने निवडणुकीपूर्वीच भाजपमधील राजकीय वातावरण तापले आहे.

सुधीर दिवे यांनी वर्धा जिल्ह्यासह नागपूर विभागात पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी काम केले आहे. सातत्यपूर्ण लोकसंपर्क आणि पक्षाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणारे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर शहराबाहेरील, म्हणजेच संपूर्ण नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची चर्चा असल्याने दिवे यांची दावेदारी महत्त्वाची मानली जात आहे.

BJP
Konkan Graduate Constituency| रायगडमध्ये किती झाले मतदान?

पक्षनिष्ठेच्या जोरावर राऊत, रेवतकर चर्चेत

दक्षिण-पश्चिम नागपुरातील भाजपचे जुने कार्यकर्ते विजय राऊत यांचे नावही उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मनपा निवडणुकीत तीन वेळा पराभव पत्करावा लागला असला तरी पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा आणि संघटनात्मक कामाची बांधिलकी कायम राहिली. त्यामुळे यावेळी पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याचा निर्णय झाल्यास राऊत यांचा विचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

किशोर रेवतकर यांनी तीन दशकांहून अधिक काळ भाजप संघटना मजबूत करण्यासाठी काम केल्याची चर्चा आहे. नागपूर जिल्ह्यात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळतानाच ग्रामीण भागातही पक्षवाढीसाठी त्यांनी योगदान दिले आहे. त्यामुळे जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय झाल्यास रेवतकर यांची दावेदारीही मजबूत होऊ शकते.

BJP
Mayem Constituency Goa Election | मयेतून प्रेमेंद्र शेट की सुलक्षणा सावंत?

देशमुख, सोले यांचाही अनुभव महत्त्वाचा

दोन वेळा नगरसेवक राहिलेले गिरीश देशमुख सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक व्यवस्थापनात सक्रिय आहेत. मतदार नोंदणी अभियानातील त्यांच्या भूमिकेचीही पक्षांतर्गत चर्चा आहे. माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्याकडे मात्र मोठा राजकीय अनुभव आहे. नगरसेवक, महापालिकेतील विविध महत्त्वाची पदे, महापौर, भाजप शहराध्यक्ष आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. त्यामुळे अनुभवी चेहऱ्याला पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाल्यास सोले यांच्या नावाचाही गांभीर्याने विचार होऊ शकतो.

BJP
IIM graduate job scam: IIM पदवी धारक महिलेला घातला गंडा... ऑफर लेटर, जॉईनिंग डेट अन् कंपनीच गायब; ७५ हजार गेले पाण्यात

कोहळे यांची दावेदारी सर्वाधिक चर्चेत

या सर्वांमध्ये माजी आमदार सुधाकर कोहळे यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत असल्याचे मानले जात आहे. नगरसेवक, नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी, आमदार, भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यातच सध्या पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने त्यांच्या दावेदारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, पक्षाने अद्याप उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जाहीर केलेला नसल्याने इतर दावेदारांच्या आशाही कायम आहेत. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसकडून वंजारींची पुन्हा तयारी?

दरम्यान, काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. बसपाने संजय थुल यांच्या नावाची घोषणा केली आहे. याशिवाय इतर बहुजन संघटनांकडूनही उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांची संख्या, मतविभागणी आणि सामाजिक समीकरणेही निकालात निर्णायक भूमिका बजावू शकतात.

BJP
Konkan Politics : कोकण मतदार संघातून ६ जणांचे अर्ज दाखल

अनुभवी चेहरा की निष्ठावान कार्यकर्ता?

भाजपसमोर सध्या उमेदवार निवडीचा मुख्य पेच आहे. अनेक पदे भूषविलेल्या अनुभवी नेत्यावर पुन्हा विश्वास ठेवायचा की अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी द्यायची, हा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर आहे. उमेदवार ठरविताना प्रादेशिक प्रतिनिधित्व, संघटनात्मक ताकद, मतदारांशी संपर्क आणि सामाजिक समीकरणांचा बारकाईने विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोहळे, दिवे, राऊत, रेवतकर, देशमुख की सोले—यापैकी नेमके कोणाच्या गळ्यात भाजपचे पदवीधर मतदारसंघाचे तिकीट पडणार, याची उत्सुकता वाढली आहे. की पक्षश्रेष्ठी सर्व चर्चांना छेद देत एखाद्या नव्या अथवा जुन्या निष्ठावान चेहऱ्याला संधी देणार? उमेदवारीचा अंतिम निर्णय होईपर्यंत नागपूर विभागातील भाजपच्या राजकारणात ही रस्सीखेच चर्चेचा केंद्रबिंदू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news