Nagpur News: ताडोबा बुकींगचे ३ कोटी भरण्याचे ठाकूर बंधूंना न्यायालयाचे आदेश

 ताडोबा
ताडोबा

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन कंपनीने ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाच्या ऑनलाईन बुकिंगच्या पैसाची अफरातफर केल्याचा प्रकरण समोर आले. यानंतर न्यायालयाने कंपनीचे मालक ठाकूर बंधूना 3 कोटी रूपये भरण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम आज गुरूवार 12 ऑक्टोबरपर्यंतच ताडोबा प्रशासनाकडे जमा करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

ताडोबा प्रशासनाची १२ कोटी १५ लाखांची फसवणूक केलेल्या अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन्ही भावडांनी १२ ऑक्टोबरपूर्वी ३ कोटी रूपये ताडोबा प्रशासनाकडे जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान दोन्ही भांवडांना ३० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला आहे. तसेच दर सोमवारी दोन तास रामनगर पोलिस ठाण्यात जावून तपास कार्यात सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी ऑनलाईन बुकींगची जबाबदारी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन नावाच्या कंपनीला देण्यात आली होती. ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत कंपनीने करार केला होता. तेव्हापासून ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर पर्यटनाची बुकिंग करीत होती. २०२० ते २०२३ या कालावधीत कंपनीने केलेल्या बुकिंग अंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फाउंडेशनकडे जमा करायची होती. मात्र या कंपनीने केवळ १० कोटी जमा केले आणि उर्वरित १२ कोटी १५ लाख ५० हजाराची रक्क्म जमा करण्यात आली नाही.
चार वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालात सुमारे १ कोटी १५ लाख ५० हजाराची अफरातफर केल्याचे निष्पर्ण झाल्याने कंपनीविरोधात रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तेव्हापासून कंपनीचे अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर दोघेही भाऊ फरार होते. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी करीत १२ ऑक्टोबरपर्यंत ३ कोटी रूपये ताडोबा व्यवस्थापनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ताडोबा व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे देखील निर्देश दिले.
दरम्यान नागपूर खंडपीठाने या सर्व बाबी लक्षात घेत, ३० हजार रूपयांच्या जात मुचलक्यावर ठाकूर बंधूना जामिन मंजूर केला. दर सोमवारी दोघेही ठाकूर बंधूना रामनगर पोलिस ठाण्यात येऊन दोन तास तपासात सहकार्य करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाची सुनावणी उद्या शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या प्रकरणाबाबत ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना विचारले असता, त्यांनी ३ कोटी रुपये आज गुरूवार १२ ऑक्टोंबरपर्यंत ताडोबा व्यवस्थापनाकडे जमा करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्याचे म्हटले आहे. आज कंपनीचे सर्वेसर्वा ठाकूर बंधू 3 कोटी रूपये ताडोबा व्यवस्थापनाकडे भरणा करतात काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news