

Nagpur Municipal Election 2026
नागपूर : समृद्धी महामार्गातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार कोटींचा घोटाळा केला. पन्नास खोके एकदम ओके कार्यक्रम समृद्धीच्या पैशातूनच झाला असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज (दि. ६) केला.
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने सर्व १५१ उमेदवारांची एकत्र बैठक नागपूरच्या महाकाळकर सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर येथील आठवणी पुसल्या जातील, असे विधान केले होते. याचा सपकाळ यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले, भाजपला आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही आठवणी पुसायच्या आहेत. देशात फक्त दोनच नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेच फोटो भाजप ठेवणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातूनही डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर यांचे फोटो काढणार आहेत, असा दावा करत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संदर्भातील वक्तव्यावर समाचार हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत घेतला.
आशिष शेलार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मतांविषयी व्यक्त केलेल्या भूमिकेवर आम्ही खुली चर्चा करायला तयार असल्याचे आव्हान दिले. अदानी यांच्या पर्यावरणविरोधी भूमिकेचे आम्ही कायम विरोधात आहोत. अदानी, अंबानी यांच्या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण व्हावे, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
राज्यभरात अंमली पदार्थांचा वाढता कारभार महायुतीच्या शासनकाळात वाढला आहे. ठाण्यात रहमान कोण हे उघड झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. शिंदे यांच्या भावाच्या शेताजवळ अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट, व्यवसाय उघडकीस आला. चाळीस बंगाली कामगार पकडले गेले असे असताना मुख्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पुण्यातील पार्थ पवार प्रकरण जसे गुलदस्त्यात गेले तसेच हे प्रकरणही थंड बस्त्यात गेल्याचा आरोप सपकाळ यांनी यावेळी केला.
मुंबईत काँग्रेसचा महापौर कोण होणार याकडे लक्ष दिले असता तो भारतीय, महाराष्ट्रीयन आणि मुंबईचा होईल. विविधतेत एकता ही देशाची, मुंबईची ओळख आहे. भाजप देशभर केवळ विकासाच्या नावावर स्वप्नरंजनाचे राजकारण करीत आहे. लोकशाहीला मारक बिनविरोध निवडणुकीची चौकशी व्हावी. न्यायालयीन लढाईच्या संदर्भात आम्ही कायदेतज्ज्ञांशी बोलत असल्याचे स्पष्ट केले.