

RPI complaint Model Code of Conduct
नागपूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ची नागपूर महानगरपालिकेत कोणत्याही राजकीय पक्षासोबत आघाडी किंवा युती नाही. प्रभाग क्रमांक २, ९ व २६ मधील काँग्रेस, भारतीय जनता पक्ष तसेच इतर राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांकडून आरपीआयचा अशोकचक्रांकित निळा ध्वज प्रचार रॅली, सभा व पदयात्रांमध्ये सर्रास वापरला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूर महानगरने केली आहे.
या संदर्भात आरपीआयचे महासचिव रजत महेशगवळी यांनी नेहरू नगर झोन व आसीनगर झोन येथे लेखी तक्रार सादर करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या घटनेतील भाग तीन, कलम २२ (१) नुसार अशोकचक्र असलेला निळ्या रंगाचा ध्वज हा पक्षाचा अधिकृत ध्वज आहे. याबाबत पक्षाने २४ डिसेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी तसेच आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांना पत्राद्वारे माहिती दिली होती.
तसेच २९ डिसेंबर रोजी नागपूर महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाचे उपविभागीय उपव्यवस्थापकीय संचालक सारथी व आचारसंहिता कक्ष प्रमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रक क्रमांक ७०१/जा/२०२५ (दि. २९/१२/२०२५) मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही राजकीय पक्ष, उमेदवार किंवा व्यक्तीने आगामी निवडणुकीत या ध्वजाचा वापर करू नये. अन्यथा निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल आणि त्याबाबतची तक्रार संबंधित झोनच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.