

नागपूर - मनपा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान 96 कार्यकर्त्यांनी भरलेले उमेदवारी अर्ज आज शुक्रवारी पक्षश्रेष्ठींसोबतच्या चर्चेनंतर मागे घेतले. अर्थातच यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनाफोनी केली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात त्यांनी सतत फोनवर या बंडखोर लोकांची मनधरणी करावी लागल्यासाठी साहित्यिकांची दिलगिरी देखील व्यक्त केली.
यापुढे नक्कीच न्याय मिळेल असा शब्द त्यांनी या उमेदवारांना दिला. नागपुरात यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजपमध्येही बंडखोरी झाली. नेत्यांपुढे नाराजी व्यक्त झाली. सहा प्रभागात तर दोन दोन उमेदवारांना भाजपने एबी फॉर्म दिले. आज यावरून बराच गोंधळ झाला. उमेदवारांना समर्थकांनी कोंडून ठेवले. आता भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा एक परिवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जात असल्याचा दावा भाजपा महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केला.
भाजपच्या ४२ आघाड्या प्रचारात, १० जानेवारीला जाहीरनामा
दरम्यान मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या ४२ आघाड्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज भाजपच्या कार्यालयात पार पडली. निवडणूक प्रचारासाठी आता केवळ १० दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने सर्व आघाड्यांनी आक्रमकपणे मैदानात उतरून जनसंपर्क करावा आणि शहराच्या विकासासाठी जनतेकडून थेट सूचना संकलित कराव्यात,असे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी यावेळी सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व महामंत्र्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,सर्वांनी ज्या भागात राहतात त्या ठिकाणी पक्षाचा प्रचार करावा.यामध्ये प्रामुख्याने व्यापारी आघाडीने सर्व व्यावसायिकांशी संपर्क साधावा,सी.ए आघाडीने त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून प्रचार करावा,फार्मसिस्ट आघाडीने त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचावे आणि दिव्यांग आघाडीने दिव्यांग लोकांसाठी पक्षाने केलेल्या कार्याची माहिती जनतेला द्यावी,अशा सूचना देण्यात आल्या.
भारतीय जनता पक्ष आपल्या जाहीरनाम्यासाठी सध्या जनतेकडून थेट सूचना मागवित असून विशेषतःशनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांत युवा मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा आणि अनुसूचित जनजाती आघाडी हे सर्व आघाड्या सक्रिय राहून जनतेच्या सूचना एकत्रित करतील. या चार दिवसांत संपूर्ण शहरातून जवळपास ४० हजार सूचना गोळा करण्याचे नियोजन आहे. येत्या १० जानेवारीला घोषित होणाऱ्या जाहीरनाम्यात या अंतर्भूत करण्यात येईल. शहराच्या कानाकोपऱ्यातील विविध भागात राहणाऱ्या नागरिकांनी क्यूआर कोडच्या माध्यमातून आपल्या सूचना प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले.यावेळी जाहीरनामा सहप्रमुख राम मुंजे,शहर महामंत्री श्रीकांत आगलावे,रितेश गावंडे संपर्क महामंत्री विष्णू चांगदे उपस्थित होते.