

राजेंद्र उट्टलवार, नागपूर
अलीकडेच महापालिकेची निवडणूक झाली. 16 जानेवारीला निकाल लागले. बहुमतात भाजपचे सरकार 102 नगरसेवकांसह चौथ्यांदा सत्तेत आले. आता महिना उलटून गेला, पण अद्याप नागपूर महापालिकेची तिजोरी कोण सांभाळणार, हे ठरलेले नाही. महापौरपदी नीता ठाकरे, तर उपमहापौरपदी लीला हाथीबेड यांची वर्णी लागली. सव्वा वर्षाचे हे पद असल्याने ते आपल्याला नकोच म्हणणारे भाजपचे निष्ठावान संजय बालपांडे दुखावले गेले. आपण पाच वर्षे कुठल्याही पदाशिवाय राहू शकतो, असा इशारा त्यांनी देऊन टाकला.
एकतर आधीच भाजप नेतृत्वाने महिलाराजचे संकेत दिले. याचाच अर्थ महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपदही महिलेकडे राहणार हे उघड झाले. शिवानी दाणी यांच्या नावाची महापौरपदासाठी चर्चा झाली तशी स्थायी समिती अध्यक्षपदाचीही चर्चा आहे. आता संजय बालपांडे यांच्यासह इतरही
इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाला कोंडीत पकडल्याची माहिती आहे. भाजपचा 120 चा दावा फसला. काँग्रेसचे मिशन 100 नगरसेवकही अर्धवटच राहिले. कुणाच्याही मदतीशिवाय भाजपची एकहाती सत्ता आली. मात्र, बहुमत असताना सत्तारूढ भाजपला अद्याप मनपाची तिजोरी कुणाकडे, याबाबतीत एकमत करता आलेले नाही.
दुसरीकडे स्वतंत्र बजेट असलेल्या परिवहनसोबतच इतर समित्यांवर कुणाला संधी दिली जाणार हेही थंडबस्त्यात गेले. आता 24 फेब्रुवारीला यासाठी सभा बोलावण्यात आली आहे. याचवेळी हायकमांडच्या लिफाफा पद्धतीने अचानकपणे ही नावे जाहीर केली जाण्याची शक्यता अधिक आहे. अर्थातच, यासाठी मुख्यमंत्री देवाभाऊ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एकत्रितपणे हिरवा कंदील महत्त्वाचा असणार आहे.